मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी दिवसभर गणेश दर्शन सुरू होते. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, मनसेचे प्रमुख राज ठाकरे , माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी भेट दिली. पण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्याही निवास्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे यांनी भेट दिल्याने राजकीय वर्तुळात साहजिकच प्रतिक्रिया उमटली.
मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी रिलायन्स उद्योगसमुहाचे मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेतले. त्यानंतर शिंदे यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या दादरमधील ‘शीवतीर्थ’ निवासस्थानी गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली. यावेळी शिंदे गटातील स्थानिक आमदार सदा सरवणकर, मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आदी उपस्थित होते.
राज ठाकरे यांच्याकडे गणेशाचे दर्शन घेण्यासाठी भेट दिली. या वेळी राजकीय चर्चा कोणताही झाली नाही. जुन्या आठवणींना उजाळा दिला, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. गेल्या तीन – चार दिवसांत भाजप नेत्यांपाठोपाठ मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे यांची भेट घेतल्याने आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेची कोंडी कशी करायची यावर खल झाल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्र्यांनी नंतर माजी मुख्यमंत्री तथा माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन गणेशाचे दर्शन घेतले. शिवसेनेतील बंडानंतर शिंदे व मनोहर जोशी यांची ही दुसरी भेट असून आगामी दसरा मेळाव्याच्या तोंडावर ती महत्त्वाची मानली जात आहे. भाजप व शिंदे गटात समन्वयाची जबाबदारी असलेले आशीष कुलकर्णी यांच्या वरळी येथील घरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट दिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहायक आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या पाली हिल येथील निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदे यांनी गणेशाचे दर्शन घेतले आणि नार्वेकर यांच्याशी संवाद साधला.