मुंबई : मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे आणि सततच्या वाहतूक कोंडींची गंभीर दखल घेत हा मार्ग तातडीने खड्डेमुक्त करावा तसेच या महामार्गाचे काम वेळेत पूर्ण व्हावे याकडे लक्ष द्यावे, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास दिले.मुंबई-नाशिक आणि भिवंडी- वाडा रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री शिंदे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेऊन रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आदेश दिला. कामचुकार अधिकारी आणि ठेकेदारांवर कठोर कारवाईचे आदेश दिले. याच बैठकीत मुंबई-नाशिक महामार्गावरील पडघा-खडावली येथे झालेल्या अपघातातील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाख रुपये देण्यात यावेत. हा निधी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे काम दर्जेदार आणि वेळेत व्हावे. निकृष्ट कामासाठी संबंधित कंत्राटदार आणि अभियंत्यावर कठोर कारवाई करा तसेच या दोन्ही रस्त्यांवरून ठाणे आणि मुंबई शहर परिसरात येणाऱ्या वाहतुकीचे नियमन करा. अवजड आणि मालवाहतुकीच्या वाहनांसाठी वेळेचे नियोजन करुन नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्याचे आदेशही शिदे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागास दिले.
राज्यातील विविध रस्त्यांवर पडलेल्या खड्डय़ांवरून विरोधकांनी मंगळवारी विधानसभेत सरकारला धारेवर धरले होते. तसेच खड्डे बुजविले जाईपर्यंत टोल वसूली थांबविण्याची मागणीही केली होती. काही महामार्गावर रस्ते की खड्डे अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. खड्डय़ांमध्ये पडून दुचाकी चालकांचे मृत्यू अलीकडेच झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या ठाणे जिल्ह्यात सर्वत्र खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. मुख्यमंत्र्यानी आदेश देऊनही खड्डे बुजबले जात नाहीत. खड्डे असूनही टोल वसूल केला जातो. अनेक ठिकाणी रस्त्यांची दुर्दशा झाली असून टोल घेणाऱ्या कंपन्यांना सरकार पाठिशी घालत असल्याचा आरोप विरोधकांनी केला.
रस्ते दुरुस्तीकडे लक्ष देण्याचे प्रशासनाला आदेश
मुंबई- नाशिक महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामात विलंब होऊ नये याकडे महामार्ग प्राधिकरणाने विशेष लक्ष पुरवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. खडवली टोल नाक्याच्या परिसरातील तसेच सेवा-रस्त्यांच्या ठिकाणाच्या सुविधांकडे लक्ष द्यावे. नागरिकांना कुठल्याही परिस्थितीत त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. मुंबई-गोवा, पालघर- अहमदाबाद या महामार्गासोबतच वसई येथे पावसामुळे झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यासाठी प्राधिकरणाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचनाही त्यांनी दिल्या. वाडा-भिवंडी रस्त्याच्या दुरूस्तीचे का संथ गतीने सुरु असल्याबाबत तसेच या परिसरात खड्डय़ांमुळे नागरिक त्रस्त असल्याबद्दल शिंदे यांनी नाराजी व्यक्त करीत प्रशासनास धारेवर धरले.