सामूहिक विकास योजनेबाबत (क्लस्टर डेव्हलपमेंट) विधिमंडळात दिलेल्या आश्वासनाप्रमाणेच योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल, असे सांगत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी शिवसेना आणि राष्ट्रवादीला चांगलेच तोंडघशी पाडले. ‘क्लस्टर’बाबत महिनाभरात निर्णय घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचा दावा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता. तर या मुद्दय़ावर बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे सांगत नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी ठाण्यातील राष्ट्रवादी नेत्यांना उपोषण सोडायला लावले होते!
सामूहिक विकास योजना ठाणे जिल्ह्य़ात लागू करण्याच्या मागणीसाठी जितेंद्र आव्हाड, संजीव नाईक व आनंद परांजपे हे उपोषणाला बसले होते. मुख्यमंत्र्यांच्या ठाणे दौऱ्याचे निमित्त साधून हे उपोषण करण्यात आले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांचा दौराच रद्द झाल्याने उपोषणाचा विचका झाला. नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी रविवारी ठाण्यात जाऊन उपोषण सोडवले. सामूहिक विकास योजनेबाबत मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून चर्चा झाली असून त्यांनी ठोस आश्वासन दिल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला. या प्रश्नावर गुरुवारी बैठक घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्याचे उदय सामंत यांनी रविवारी जाहीर केले. मात्र, २४ तास उलटत नाहीत तोच मुख्यमंत्र्यांनी ‘आपण क्लस्टरप्रश्नी कोणतीही बैठक बोलावलेली नाही’, असे स्पष्ट केले. आगरी सेनेचे राजाराम साळवी यांच्या काँग्रेसप्रवेशानिमित्त प्रदेश काँग्रेस मुख्यालयात बोलताना मुख्यमंत्र्यांनी क्लस्टर प्रकरणी कानावर हात ठेवले. क्लस्टर योजना लागू करण्याबाबत आपण पावसाळी अधिवेशनात आश्वासन दिले आहे. त्यानुसारच निर्णय घेतला जाईल असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. मात्र, ही योजना नक्की कधी लागू होईल याबाबत त्यांनी मौन बाळगले.
शिवसेनेलाही चपराक
ठाणे जिल्ह्य़ातील अनधिकृत बांधकामांनाही क्लस्टर योजना लागू करावी अशी जितेंद्र आव्हाड यांची मागणी आहे. शिवसेनेनेही या प्रश्नावर रहिवाशांचा मोर्चा काढण्याची घोषणा केली. मात्र, मोर्चाच्या वेळी शिवसैनिकांनी थांबावे म्हणून नेत्यांनाच पुढाकार घ्यावा लागला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून महिनाभरात निर्णय घेणार असल्याचा दावा केला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आता कानावर हात ठेवल्याने शिवसेनेलाही चपराक बसली असल्याची चर्चा आहे. बहुधा लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच हा निर्णय जाहीर केला जाईल, अशी चर्चाही रंगू लागली आहे. ठाण्यातील काँग्रेस नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांशी क्लस्टरबाबत चर्चा केली होती. महिनाभरात ही योजना लागू करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे या सर्वानीच जाहीर केले होते, हे विशेष.
राष्ट्रवादीत नाराजी
क्लस्टर योजनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना भेटीसाठी वेळ देतात. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांबरोबर चर्चा करतात. मात्र, राष्ट्रवादीच्या नेत्यांना टाळतात यावरून राष्ट्रवादीत नाराजीचा सूर उमटला आहे.
बैठक होणारच?
पुर्नविकासासंदर्भात चर्चा करण्यासाठी गुरुवारी सायंकाळी ४ वाजता सह्य़ाद्री अतिथीगृहात मुख्यमंत्री ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेणार आहेत, अशी माहिती गणेश नाईक यांनी पत्रकारांना दिली.
पक्षाचा ‘सोशल मीडिया मेळावा आणि राजाराम साळवी यांचा पक्षप्रवेश यासाठी रविवारी ठाण्यात जाणार होतो. मात्र, काही कारणाने हा दौरा रद्द करावा लागला.
– पृथ्वीराज चव्हाण, मुख्यमंत्री