ऊस दराचा प्रश्न साखर कारखाने व शेतकऱ्यांनी एकत्र बसून सोडवावा. राज्य सरकार त्यात हस्तक्षेप करणार नाही. मात्र साखर उद्योगाच्या प्रश्नावर केंद्र सरकारकडून जास्तीची मदत मिळविण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या भेटील नेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मंत्रिमंडळाला दिली.ऊस दरावरून पश्चिम महाराष्ट्रात सुरू असलेल्या आंदोलनामुळे कोल्हापूर आणि सांगली जिह्यातील कारखाने अद्याप सुरू झालेले नाहीत. त्यातच राज्यातील मंत्र्यांनीच साखरेचे दर पाडून भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. त्याचे पडसाद बुधवारी मंत्रिमंडळात उमटले. हा प्रश्न निकाली काढावा, शेतकऱ्यांची जादा दराची मागणी रास्त असल्याने ती मान्य करावी, अशी मागणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील. हर्षवर्धन पाटील आदींनी केली. हवे तर त्यासाठी गृहमंत्री आर. आर. पाटील आणि सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांची समिती नेमा. पण ऊस दराचे आंदोलन आणखी न ताणता २४ नोव्हेंबरपूर्वी तोडगा काढावा, अशी मागणी मंत्र्यांनी लावून धरली मात्र मुख्यमंत्र्यांनी ती फेटाळली.