शिवसेनेच्या शिंदे आणि ठाकरे गटाच्या दृष्टीने निवडणूक आयोगाकडून एक मोठा निर्णय आज जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे गटाला उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना असं नाव अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरे गटासाठी ‘धगधगती मशाल’ हे चिन्ह देण्यात आलं आहे. तर शिंदे गटाचे तिन्ही चिन्हं निवडणूक आयोगानं अमान्य केली असून पुन्हा नव्याने तीन चिन्हे सूचवा, असा आदेश निवडणूक आयोगानं दिला आहे.

हेही वाचा : “…ही आमच्यासाठी एक दु:खद घटना, हा आमच्यावरचा खऱ्या अर्थाने अन्याय”

आयोगाच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमवेतचा फोटो आणि “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रखर हिंदुत्ववादी विचारांचा अखेर विजय. आम्हीच बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार….” असं लिहित भावना व्यक्त केली आहे.

PHOTOS : शिवसेनेचं चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया

याशिवाय प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “मी आमच्या सर्व कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना शुभेच्छा देतो. एक चांगली सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. निवडणूक आयोगाला देखील मी मनापासून धन्यवाद देतो. उद्या चिन्ह दिले जातील. आम्ही जी तीन चिन्ह दिली होती, ती चिन्ह रद्द केली असली, तरी आता उद्या सकाळी चिन्ह दिली जातील आणि त्यातून एक चिन्ह आम्हाला मिळेल.”

हेही वाचा : निवडणूक आयोगाकडून ‘बाळासाहेबांची शिवसेना’ नाव मिळाल्यानंतर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर ठाकरे गटाला मिळालेल्या चिन्हाबाबत प्रतिक्रिया विचारली असता “त्यांना मिळालेलं चिन्ह आणि त्यांना मिळालेलं नाव याबाबत तुम्ही त्यांनाच विचारा, तेच योग्य राहील. मशाली अन्यायाविरुद्ध पेटल्या पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देखील अन्यायाविरुद्ध मशाली पेटवल्या होत्या. आम्ही अन्याय दूर करणारा पक्ष आहे. हा राज्यातील जनतेचा पक्ष आहे. हे जनतेचं सरकार आहे. या सरकारमध्ये सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात काय बदल घडू शकतो? हे आम्ही पाहणार आहोत. त्यासाठी सरकार कटीबद्ध आहे. मग शेतकरी कष्टकरी बळीराजा असेल, कामगार, वारकरी, समाजातील सर्व घटक महिला, विद्यार्थी, शिक्षक आदी सर्व समाजातील घटकांच्या जीवनता चांगला बदल कसा होईल, या दिशेने सरकार पावलं टाकत आहे.” असं मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितलं.