राज्य सरकार अस्तित्वात नसल्याने गरीब रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून वैद्यकीय मदत मिळण्यात अडचण येत असल्याने त्यावर तोडगा म्हणून राष्ट्रपती राजवट लागू असेपर्यंत महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांमार्फत गरीब रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत समाविष्ट ५८१ समान उपचारपद्धती वगळून उर्वरित आजारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून अर्थसहाय देण्याबाबत अर्जाची छाननी करतील. आवश्यक कागदपत्रे व पात्रता तपासून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समिती पात्र अर्जाची शिफारस करेल.

अर्जाची छाननी करण्याची कार्यवाही करण्याकरिता लागणारा अनुभवी, आवश्यक अधिकारी, कर्मचारीवृंद  उपलब्ध करून देण्याची कार्यवाही अपर मुख्य सचिव (सेवा) यांनी करावी, असेही नमूद करण्यात आले आहे. सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना, जीवनदायी भवन, दुसरा मजला, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय आवार, गणपतराव जाधव मार्ग, वरळी नाका, वरळी, मुंबई- ४०००१८, दूरध्वनी – ०२२-२४९९९२०३/०४/०५ या ठिकाणी गरजूंनी अर्ज सादर करावेत, असे कळविण्यात आले आहे.