मुंबई : प्रकाशाचा आणि आनंदाचा सण दिवाळी आता दारात आला आहे. घराघरात स्वच्छतेची लगबग, फटाक्यांचा आवाज आणि गोड पदार्थांची रेलचेल.सगळीकडे सणोत्सवाचे वातावरण निर्माण झाले आहे. पण या जल्लोषात मुलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यास त्याची किंमत चुकवावी लागू शकते. विशेषतः दम्याने, एक्झिमाने किंवा अ‍ॅलर्जीने त्रस्त असलेल्या मुलांसाठी दिवाळीचा काळ थोडा अधिक काळजीचा असतो. दरवर्षी दिवाळीपाठोपाठ डॉक्टरांकडे जाणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

फटाक्यांच्या धुराचा घातक परिणाम हा दिवाळीत सर्वात घातक ठरतो. असेही गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणाचा प्रश्न प्रामुख्याने शहरी भागात ऐरणीवर आलेला आहे. त्यातच दिवाळीत मोठ्या प्रमाणात फटाके लावण्यात येत असल्यामुळे लगान मुलांच्या श्वसनाच्या विकाराचे प्रश्न निर्माण होताना दिसतात.फटाक्यांच्या धुरात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड्स आणि सूक्ष्म धूळकण यांसारखे रसायन असतात. हे घटक श्वसनाच्या समस्यांना चालना देतात. डॉक्टरांच्या मते, लहान मुलांची फुफ्फुसे अजून विकसित होत असतात, त्यामुळे त्यांना धुरामुळे श्वास घेण्यास त्रास, खोकला किंवा दम्याचा झटका येऊ शकतो. बंद खिडक्या असलेल्या घरांमध्ये हा धूर जास्त साचतो, त्यामुळे घरातील हवा शुद्ध ठेवणे महत्त्वाचे आहे.

दिवाळीपूर्वी घराघरांमध्ये मोठी साफसफाई सुरू होते. शहरी भागात बहुतेक घरात एसी असल्यामुळे असेही खिडक्या दारे बंद असतात. त्यातुनच श्वसनाचा एक वेगळाच मुद्दा अशा घरांमध्ये निर्माण झालेला असतो. याशिवाय दिवाळीत सफसफाई करताना कपाटे, गालिचे, पडदे, जुनी पुस्तके हलवताना धूळ आणि बुरशी हवेत पसरते. त्यामुळे त्वचेवर खाज, लालसरपणा, डोळ्यांची जळजळ किंवा सतत शिंक येणे अशी लक्षणे दिसू शकतात. त्यामुळे स्वच्छतेदरम्यान घरातील खिडक्या उघड्या ठेवाव्यात, मास्क वापरावा आणि अ‍ॅलर्जी असलेल्या मुलांना धूळ असलेल्या ठिकाणी न नेता दुसऱ्या खोलीत ठेवावे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.

दिवाळीत गोडधोड पदार्थांची रेलचेल असते. परंतु अनेक मिठाई आणि फराळातील घटक ज्यात शेंगदाणे, काजू, बदाम, दूध, तूप किंवा कृत्रिम रंग असतो. एरवी हे पदार्थ आपण मोठ्या प्रमाणात खात नाही. मात्र दिवाळीत हटकून फराळ जोरात केला जातो. काही मुलांमध्ये यामुळे अ‍ॅलर्जी निर्माण करू शकतात. बाहेरून मिठाई घेताना त्यातील घटक तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे शक्यतो ओळखीचे आणि घरगुती तयार केलेले पदार्थ मुलांना देणे अधिक सुरक्षित ठरते, असा सल्ला बालरोगतज्ज्ञ देतात.

दिवाळीचा सण आनंदाचा असला तरी मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने पालकांनाही काही काळजी घेणे आवश्यक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.शक्यतो फटाक्यांऐवजी दिवे, कंदील, रंगोली आणि पर्यावरणपूरक सजावट वापरा.घरातील हवा स्वच्छ ठेवण्यासाठी खिडक्या उघड्या ठेवा किंवा एअर प्युरिफायर वापरा.दम्याची औषधे आणि इनहेलर नेहमी सहज उपलब्ध ठेवा.

एक्झिमा असलेल्या मुलांच्या त्वचेवर नियमित मॉइश्चरायझर लावा. धूर, अनावश्यक बाहेरचे खाणे मुलांसाठी टाळा.दिवाळी ही फक्त प्रकाशाची नाही, तर आरोग्य आणि आनंदाचीही उजळणी करणारा सण आहे. थोडीशी काळजी आणि नियोजन ठेवल्यास मुलांसह सर्वांसाठीच ही दिवाळी केवळ आनंददायीच नव्हे, तर सुरक्षित आणि सुखद ठरू शकते.