लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : लहान मुलांचा खेळण्याकडे कल अधिक असतो. उन्हाचीही ते तमा बाळगत नाहीत. त्यामुळे सध्याच्या वाढत्या तापमानामध्ये लहान मुलांमध्ये निर्जलीकरणाचे प्रमाण वाढताना दिसत आहे. हे रोखण्यासाठी शाळांमध्ये ‘पाणी सुट्टी’ जाहीर करावी, अशा सूचना तज्ज्ञ डॉक्टरांकडून करण्यात येत आहेत. जेणेकरून मुले योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन करतील आणि त्यांच्या शरीरातील पाणी पातळी राखण्यास मदत होईल. केरळ, झारखंड, हरियाणासह महाराष्ट्रातील शाळांमध्ये पाणी सुट्टी जाहीर करण्यावर तज्ज्ञांनी भर दिला आहे.

पाणी हे आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असले तरी अनेकजण पाणी पिण्याकडे दुर्लक्ष करतात. तर लहान मुले खेळण्याच्या नादामध्ये पाणी पित नाहीत. परिणामी पाण्याच्या अभावामुळे होणाऱ्या आजारांमुळे देशामध्ये दरवर्षी जवळपास १० हजार बालकांचा मृत्यू होतो. यामध्ये महाराष्ट्रातील जवळपास दोन हजार बालकांचा समावेश आहे. बाह्यरुग्ण विभागात दररोज साधारणपणे २० टक्के रुग्ण हे पाण्याचे कमी सेवन केल्याने होत असलेल्या आजाराने बाधित होऊन येतात. पाणी कमी सेवन करणे हे लहान मुलांच्या जीवावर बेतण्याची शक्यता असते. त्यामुळे महाराष्ट्रातील शाळांमध्ये ‘पाणी सुट्टी’ देण्यात यावी. राज्य सरकारने प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम एक ते दोन शहरांमध्ये सुरू करण्याची आवश्यकता आहे, अशी सूचनाा बालरोग तज्ज्ञ डॉ. ललित वर्मा यांनी केली आहे.

आणखी वाचा-चक्रीवादळाचा मुंबईत इशारा नाही- हवामान विभाग

वाढत्या तापमानामध्ये मुलांना निर्जलीकरणाबरोबरच अतिसाराच्या त्रासाला सामोरे जावे लागते. पाच वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अतिसार आणि निर्जलीकरणामुळे दरवर्षी १० हजार मुलांचा मृत्यू होतो. निर्जलीकरण व अतिसाराचा त्रास होत असलेल्या मुलांसाठी ओआरएस फायदेशीर ठरते. मात्र अतिसार झाल्यावर जवळपास ६० टक्के मुलांना ओआरएस दिले जाते. तर ४० टक्के मुले अजूनही त्यापासून वंचित आहेत. पालकांमध्ये ओआरएसबद्दल असलेले अज्ञान यास कारणीभूत आहे. अतिसारचा त्रास सुरू झाल्यावर रुग्णांना ओआरएसचे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जेणेकरून शरीरातील पाणी आणि मीठाचे प्रमाण कायम राहील. मात्र मूत्रपिंड आणि हृदयावर परिणाम करणारे शुगर ड्रिंक पालकांकडून मुलांना दिले जात असल्याचे बालरोग तज्ज्ञ डॉ. विभोर बोरकर यांनी सांगितले.