लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा तयार होऊन त्याचे रुपांतर शनिवारी चक्रीवादळात, तर रविवारी महाचक्रीवादळात होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दरम्यान, मुंबईत या चक्रीवादळाचा परिणाम होणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर प्रसारित झाली होती. मात्र, मुंबईत या चक्रीवादळाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

चक्रीवादळाचा तडाखा मुंबई शहराला बसणार असल्याच्या अफवा व्हॉट्स ॲप, एक्सच्या माध्यमातून पसरविण्यात येत आहेत. दरम्यान, चक्रीवादळ बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. त्याचा कोणताही परिणाम मुंबई, तसेच राज्यात पहायला मिळणार नाही. याबाबत कोणताही इशारा जारी केलेला नसल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

आणखी वाचा-मुंबई : दाऊदशी संबंधित गुन्ह्यांत अडकल्याचे भासवून व्यावसायिकाची सायबर फसवणूक

हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी ३५.६ अंश सेल्सिअस, तर, सांताक्रूझ केंद्रात ३४.६ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईसह, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पुढील तीन-चार दिवस कोरडे वातावरण राहील. तर धुळे, जळगाव भागात शनिवारी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

मोसमी वाऱ्यांची प्रगती

मोसमी वाऱ्यांनी शुक्रवारी मालदीव, कोमोरीन भाग, बंगालच्या उपसागराचा दक्षिण भाग व्यापला आहे. पुढील दोन दिवसांत मोसमी वारे मध्य बंगालचा उपसागर, दक्षिण बंगालच्या उपसागराचा काही भाग व्यापेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.