मुंबई : मध्य रेल्वेवरील मुंबई विभागातील रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी, रविवारी मध्य रेल्वेवर ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या ब्लाॅकमुळे चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकांतील थांबा रद्द करण्यात येणार आहे. परिणामी, लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीसह लालबाग, चिंचपोकळी, करी रोड परिसरातील गणपती दर्शनाला जाणाऱ्या गणेशभक्तांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर शनिवारी ब्लाॅक घेण्यात आल्याने, रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लाॅक नाही.लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणीच्या दर्शनाला जाण्यासाठी गणेशभक्त करी रोड आणि चिंचपोकळी स्थानकात उतरतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने गणपतीच्या दर्शनाला जाणाऱ्यांची संख्या अधिक असणार आहे. परंतु, रविवारी ब्लाॅक असल्याने या दोन्ही स्थानकांत लोकल थांबा नसेल. गणेशोत्सव काळात मध्य रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.
मध्य रेल्वे
मुख्य मार्ग
कुठे : सीएसएमटी ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर
कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत
परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकावर डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपरवरून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ पर्यंत सुटणाऱ्या अप धीम्या लोकल सेवा विद्याविहार – सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.
हार्बर मार्ग
कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर
कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत
परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल सेवा आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ पर्यंत सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला – सीएसएमटी आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागांवर विशेष लोकल चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.
पश्चिम रेल्वे
कुठे : मुंबई सेंट्रलवर ब्लाॅक
कधी : शनिवारी रात्री १२.३० ते पहाटे ४ पर्यंत
परिणाम : रेल्वे रूळ, सिग्नल यंत्रणा, ओव्हर हेड वायरची देखभाल-दुरूस्ती करण्यासाठी आणि इतर पायाभूत कामे करण्यासाठी शनिवारी रात्रकालीन ब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर दिवसभर ब्लाॅक नसेल.