मुंबई : मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतल्यानंतर त्याला विरोध करत अनेक मुंबईकर बुधवारी रस्त्यावर उतरले. काहींच्या मते कबुतरांना अन्न देणे ही धार्मिक भावना आहे तर काहींनी प्रशासनाचा हा निर्णय अमानवी असल्याचा आरोप केला. मात्र, मुंबईतील बेसुमार वृक्षतोड, हवा प्रदूषण, नदी, तलाव यांची दुरवस्था, कांदळवनांचा ऱ्हास याबाबत अपवादानेच मुंबईकर एकवटल्याची उदाहरणे आहेत. यामुळे गंभीर विषयावर मुंबईकर गप्प का बसतात, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बुधवारी अनेक नागरिकांनी त्याविरोधात निदर्शने केली. काहींच्या मते कबुतरांना दाणा-पाणी देणे ही धार्मिक परंपरा आहे, तर काहींनी हा निर्णय ‘अमानवी’ असल्याचा आरोप केला. अनेक ठिकाणी कबुतरांना अन्न देण्यासाठी बांधण्यात आलेल्या सुविधांलगत नागरिकांनी गर्दी करत निषेध नोंदवला. मात्र, याच शहरात इतर अनेक गंभीर समस्या आहेत. बेसुमार वृक्षतोड व त्यातून होणारे पर्यावरणीय नुकसान, हवा प्रदूषण या सर्व गोष्टींबाबत क्वचितच सार्वजनिक संताप उफाळून येतो. समाजमाध्यमांवर दोन दिवस चर्चा होते व मग ती शांत होते. प्रत्यक्ष कृती, आंदोलने वा एकवटलेली मागणी ही दिसून येत नाही.

पर्यावरणप्रेमी, भूमिपुत्रांचा लढा

‘मेट्रो ३’ (कुलाबा-वांद्रे-कुलाबा) कारशेडसाठी आरेमधील जवळजवळ दोन हजारांहून अधिक वृक्षांवर कुऱ्हाड चालविण्यात आली. त्यासाठी फक्त स्थानिक रहिवासी व पर्यावरणप्रेमींनी विरोध केला होता. यावेळी २०१९ मध्ये रात्रीच्या वेळी आरेतील झाडे कापण्यात आली. त्या वेळी आंदोलकांनी आरे वसाहतीत धाव घेऊन वृक्षतोड थांबवली. या वेळी ‘एमएमआरसी’ने २०० ते २५० झाडांची कत्तल केली होती. यावेळी एकाही मुंबईकराने कडाडून विरोध केला नाही. या विरोधात संपूर्ण मुंबई एकवटण्याऐवजी केवळ स्थानिक रहिवासी, पर्यावरणप्रेमी आदिवासी समाज रस्त्यावर उतरला. अनेकदा त्यांच्यावर तक्रार दाखल झाल्या आहेत. अजूनही आरेमध्ये ही स्थिती कायम आहे. यासाठी फक्त स्थानिक पर्यावरणप्रेमी व भूमिपुत्र आदिवासी लढा देत आहेत. दरम्यान, गतवर्षी मुंबईतील वायूप्रदूषणाने पातळी ओलांडली होती. सातत्याने मुंबईची हवा अनेक दिवस वाईट श्रेणीत नोंदली गेली. पण यावेळी मुंबईकरांच्या आवाजाचा लवलेशही दिसला नाही.

संस्था, कार्यकर्ते यांचाच सहभाग

कांदळवनांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. तेथील पशू, पक्षी मानवी वस्तीत शिरत आहेत वा मृत्यू होत आहे. परिसंस्थेतील अनेक प्रजाती धोकादायक स्थितीत आहेत. मात्र, त्यांच्यासाठी मुंबईकरांचा आवाज उठताना दिसत नाही. मुंबईतील नदी, तलाव प्रदूषणाच्या विळख्यात आहेत. तेथील जीवसृष्टीही हास होण्याच्या मार्गावर आहे. मात्र, त्याबाबत ठराविक संस्था, कार्यकर्ते वगळता चर्चाही होताना दिसत नाही.

नागरिक पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल असंवेदनशील असतात. झाडे तोडली जातात, पक्ष्यांची घरटी नष्ट केली जातात, तेव्हा ते शांतपणे पाहत राहतात. पर्यावरणाचे संरक्षण ही काळाची गरज आहे, प्रत्येक पक्ष्याला त्याचे अन्न मिळेल. त्यासाठी इतर सवयी लावणे चुकीचे. – स्टॅलीन डी, पर्यावरणवादी, संचालक, वनशक्ती