Mumbai ST Bank Co-Operative Meeting : मुंबईत आज एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांचे कार्यकर्ते आणि शिवसेना (शिंदे) यांच्या कार्यकर्त्यांममध्ये एसटी बँकेच्या कार्यालयात जोरदार हाणामारी झाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मुंबईतील एसटी बँकेच्या कार्यालयात ही घटना घडली असून या घटनेमुळे एसटी बँकेच्या कार्यालयात मोठा गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. दरम्यान, भ्रष्टाचाराचे आरोप दोन्ही गटांनी एकमेकांवर केले आहेत. याच मुद्यावरून बैठकीत गोंधळ झाला आणि याचं रुपांतर हाणामारीत झासल्याचं सांगितलं जात आहे.
आनंदराव अडसूळ काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेना (शिंदे) नेते आनंदराव अडसूळ यांनी एबीपी माझा या वृत्तावाहीनीशी बोलताना म्हटलं की, “वस्तुस्थिती अशी आहे की, काही दिवसांपूर्वी गुणरत्न सदावर्ते यांनी एसटी महामंडळाचा संप केला होता. मात्र, तो संप काही यशस्वी झाला नाही, त्यातील त्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. लोकांना गुणरत्न सदावर्ते यांची कार्यपद्धती रुचली नाही, त्यामुळे अनेकजण परत ज्यांच्या त्यांच्या युनियनमध्ये आलेले आहेत. आमची एसटी कामगारांची संघटना आहे, त्या संघटनेचा मी अध्यक्ष आहे. तसेच आमची एसटी बँकेची देखील युनियन आहे”, असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.
“एसटी बँकेत गुणरत्न सदावर्ते याचं एक पॅनल निवडून आलेलं आहे. मात्र, त्यानंतर त्यांनी अनेक गैरव्यवहार केले. त्याला कंटाळून त्यांचे काही सदस्य आमच्या बाजूला आले. त्यांच्या या कारभारामुळे लोकांना आता सुरक्षित वाटत नाही, तसेच त्यांनी अनेक वेगवेगळ्या माध्यमातून भ्रष्टाचार केला आहे”, असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे.
“एसटी बँकेत काम करणाऱ्या १२५ कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आलेली आहे. या भरतीत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करण्यात आला आहे. त्याला आम्ही संघटनेच्या माध्यमातून स्थगिती आणली. पण तरीही त्यांनी ती भरती सुरू ठेवली. त्या माध्यमातून त्यांनी पैसै कमावले. एसटी बँकेत १२ कोटींचं एक सॉफ्टवेअर त्यांनी थेट ५२ कोटींना खरेदी केलं”, असा आरोप आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.
व्हिडीओत काय दिसत आहे?
एसटी को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राडा झाल्याचं व्हायरल व्हिडीओत दिसत आहे. तसेच दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांवर बैठकीतील पाण्याच्या बाटल्या फेकत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे. तसेच या घटनेत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.