मुंबई : अकरावी प्रवेश प्रक्रियेमध्ये उद््भवणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहे. आता नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही त्यांच्या अडचणी कायम आहेत. अर्ज नोंदणीदरम्यान अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांकडून गुण भरताना झालेली चूक सुधारण्यासाठी त्यांनी अर्ज अद्ययावत केल्यानंतर त्यांच्या लॉगिनमध्ये चुकीचे व दुरुस्ती केलेले दोन्ही गुण दाखवले जात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असून, त्यांच्या टक्क्यांमध्येही बदल झाला आहे. परिणामी, काेट्यांतर्गत प्रवेशानंतरही अनेक विद्यार्थी व पालक शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षामध्ये अर्जातील सुधारणा करण्यासाठी फेऱ्या मारत आहेत.

सीबीएसई, आयसीएसई या अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाचा अर्ज भरताना स्वत: गुण भरावे लागतात. अनेक विद्यार्थ्यांचा ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ या सूत्रानुसार गुण भरताना गोंधळ उडतो. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी चुकीचे गुण भरले. मात्र ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयात अर्ज अद्ययावत करण्यासाठी धाव घेतली. त्याची दखल घेत या विद्यार्थ्यांना अर्ज अद्ययावत करण्याची मुभा देण्यात आली. अर्ज अद्ययावत केल्यानंतर विद्यार्थ्यांना लॉगिनमध्ये गुण अद्ययावत झाल्याचे दाखविण्यात आले. मात्र काही दिवसांनी विद्यार्थ्यांनी पुन्हा अर्ज तपासला असता लॉगिनमध्ये चुकीच्या गुणांबरोबरच दुरुस्त करण्यात आलेले गुण एकत्रित दाखविण्यात आले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे ५०० ऐवजी १००० पैकी गुण दाखविण्यात येत आहेत. परिणामी, विद्यार्थ्यांच्या गुणांमध्ये वाढ होऊन त्यांच्या टक्केवारीमध्येही बदल झाला आहे. त्यामुळे अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीमध्ये या विद्यार्थ्यांना फटका बसण्याची शक्यता आहे. शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थी व पालकांनी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे धाव घेतली आहे. मात्र शिक्षण उपसंचालक कार्यालयामधील मदत कक्ष या विद्यार्थी व पालकांची थेट मदत करण्यास हतबल ठरत आहे. तक्रारीचे निवारण करण्याचे संपूर्ण अधिकार पुणे येथील शिक्षण संचालकांच्या कार्यालयाला आहेत. त्यामुळे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातील मदत कक्षातील अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांच्या तक्रारी नोंदवून त्या पुणे येथील संचालक कार्यालयाकडे पाठविण्यात येत आहेत. यावर संचालक कार्यालयाकडून लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा, अशी विनंती विद्यार्थी व पालकांकडू करण्यात येत आहे.