क्लीन अप मार्शलविषयी चर्चा झाली असली तरी ही योजना बंद करण्याबाबत प्रशासनाचा कोणताही निर्णय झाला नसल्याचे घन कचरा व्यवस्थापन विभागाच्या मुख्य अभियंत्याने शुक्रवारी स्पष्ट केले. मात्र, उद्धट वर्तणूक करणाऱ्या, अयोग्य दंड आकारणाऱ्या ५६ क्लीन अप मार्शलवर गेल्या महिन्याभरात कारवाई करण्यात आली आहे.
रस्त्यावर थुंकणाऱ्या, लघवी करणाऱ्या, कचरा टाकणाऱ्या नागरिकांकडून दंड वसूल करण्यासाठी क्लीन अप मार्शल तैनात करण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात त्यांच्याकडून त्रास होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.  स्थायी समिती बैठकीतही काही नगरसेवकानी याबाबत आवाज उठवला होता. तेव्हा क्लीन अप मार्शलचे अधिकार काढून ते विभाग पातळीवर अधिकाऱ्यांना देण्याचा विचार असल्याचे अध्यक्षांनीच सांगितले होते. मात्र असा कोणाताही निर्णय झाला नसल्याचे मुख्य अभियंता प्रकाश पाटील म्हणाले. सहाय्यक आयुक्तांकडे तक्रार आल्यास त्याबाबत कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या महिन्याभरात क्लीन अप मार्शलनी शहरातून दोन कोटी वीस लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे.

क्लीन अप मार्शलवर कारवाई
शहरातील ७०० क्लीन अप मार्शलपैकी ५६ मार्शलवर उद्धट वर्तणूक, अयोग्य दंड आकारल्याप्रकरणी कारवाई झाली असून यातील सर्वाधिक मार्शल अंधेरी विभागातील आहेत. या मार्शलबाबत स्थानिक पोलिसांना माहितीही देण्यात आली आहे. क्लीन अप मार्शलबाबत तक्रारी आल्यास त्याची नोंद घेण्यात येते. अयोग्य रितीने आकारण्यात आलेला १०० किंवा २०० रुपयांचा दंडही परत देण्यात येतो. मात्र अनेकदा चूक झाल्यावर नागरिक चिरीमिरी देण्याचा प्रयत्न करतात, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी  कचरा टाकू नये, शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, असे आवाहन त्यांनी केले.