मुंबई : विधासभेच्या १६० मतदार संघात फेरफार करण्याबाबत ऑफर होती हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा दावा कपोलकल्पित असून काँग्रेस नेते राहुल गांधींच्या भेटीचा हा परिणाम दिसतोय अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पवारांच्या दाव्याची खिल्ली उडवली. खोटे बोलायचे आणि पळून जायचे असे हे पळपुटे लोक आहेत असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.
विधानसभा निवडणुकीच्या वेळी १६० जागा जिंकून देण्याची हमी दोन व्यक्तींनी दिली होती. मात्र निवडणूक आयोगावर कोणतीही शंका नसल्यामुळे या व्यक्तींच्या दाव्याकडे दुर्लक्ष केले. आणि आम्ही जनतेचा कौल मान्य करण्याचे ठरवले असा गौप्यस्फोट शरद पवार यांनी आज केला.
पवार यांच्या या दाव्यावर बोलताना, इतक्या दिवसानंतर तेही राहुल गांधींना भेटल्यावरच याची आठवण कशी झाली. इतके दिवस ते बोलले नाहीत आणि आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम-जावेदच्या कहाण्या तयार करून त्यांच्या कथानकावर दररोज कपोलकल्पित आरोप करीत आहेत. तशीच अवस्था पवारांची तर झाली नाही ना, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.
राहुल गांधी जरी मतदान यंत्राबाबत सातत्याने बोलत असले तरी देखील शरद पवार कधी बोलत नव्हते. किंबहुना मतदान यंत्राला दोष देणे अयोग्य असल्याची भूमिका पवार यांनी वेळोवेळी घेतली. पण आता ते जे काही बोलत आहेत,त्यावरुन हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम दिसतोय. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून एक प्रकारचा संभ्रम निर्माण केला जात असला तरी भारतासाखऱ्या नि: पक्ष आणि पारदर्शी निवडणुका कोणत्याच देशात होत नाहीत हे सर्वांना माहित आहे.
सगळ्यात महत्त्वाचे विरोधक जे जनतेत बोलत आहेत. ते निवणूक आयोगाने बोलविल्यावर जात नाहीत. आयोगासमोर शपथपत्र द्यायला तयार नाहीत. संसदेत शपथ घेतल्याचे सांगत आहेत. आम्ही संसदेत शपथ घेतल्याचे सांगून उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात शपथपत्र देणार नाही असे सांगता येईल का अशी विचारणा करीत, राहुल गांधी खोटे बोलत असून खोटे पकडले गेले आणि ते शपथपत्रावर दिले तर उद्या फौजदारी कारवाई होऊ शकते अशी त्यांना भिती वाटते आहे. म्हणूनच रोज खोटे बोलायचे आणि पळून जायचे, असे हे पळपुटे विरोधक असल्याचा टोलाही फडणवीस यांनी लगावला.