मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) विरार-उत्तन सागरी सेतू प्रकल्पासाठी ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र खर्च कमी करण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प आराखड्याचे सहा सुधारित पर्याय तयार केले. या पर्यायांचे गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या एका विशेष बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या सहा पर्यायांमधून ५२ हजार ६५२ कोटी रुपयांच्या पर्यायाची निवड मुख्यमंत्र्यांनी केली. त्यामुळे आता या प्रकल्पाचा खर्च ३१ हजार ७७५ कोटी रुपयांनी कमी झाला आहे.
मुंबईतील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी एमएमआरडीएने अंदाजे ९४ किमी लांबीचा (जोडरस्त्यासह) वर्सोवा – विरार सागरी सेतू बांधण्याचा निर्णय घेतला होता. मागील दोन वर्षांपासून एमएमआरडीए या प्रकल्पासाठी नियोजन करीत होती. प्रकल्पाचा आराखडा तयार करण्यात येत होता, तसेच आर्थिक नियोजन सुरू होते. या प्रकल्पासाठी ६३ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. पण आता मात्र सागरी सेतूची लांबी ९४ किमीवरून ५५ किमी करण्यात आली आहे. वर्सोवा – विरार सागरी सेतू प्रकल्प रद्द करून आता केवळ उत्तन (भाईंदर) – विरार दरम्यान सागरी सेतू बांधण्यात येणार आहे. मुंबई महापालिका वर्सोवा ते दहिसर-भाईंदर सागरी किनारा मार्ग (कोस्टल रोड) बांधणार आहे. एकाच ठिकाणी दोन प्रकल्प होऊ घातल्याने एक प्रकल्प रद्द करणे आवश्यक होते. त्यामुळे वर्सोवा – विरार सागरी सेतू रद्द करण्यात आला आहे.
महापालिकेचा सागरी किनारा रस्ता संपेल तेथून जोडरस्त्याद्वारे उत्तन – विरार सागरी सेतूला सुरुवात होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाने यास मान्यता दिली असून उत्तन – विरार सागरी सेतूचे काम पहिल्या टप्प्यात केले जाणार आहे; तर दुसऱ्या टप्प्यात उत्तन – विरार सागरी सेतूचा विरार – पालघर दरम्यान विस्तार करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यातील उत्तन – विरार सागरी सेतूसाठी ८७ हजार ४२७ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे एमएमआरडीएसमोर आव्हान आहे. हा प्रकल्प कमीत कमी खर्चात राबविता येईल का याचा विचार करून एमएमआरडीएने सुधारित आराखडा तयार केला आणि खर्चाचे सहा प्रस्ताव सरकारकडे सादर केले. या सहा पर्यायांमधून मुख्यंमत्र्यांनी ५२ हजार ६५२ कोटी रुपयांच्या पर्यायाला पसंती दिली असून हा पर्याय अंतिम केला आहे.
अशी झाली बांधकाम खर्चात बचत
मुख्यमंत्र्यांनी निवडलेल्या प्रस्तावानुसार आता प्रकल्पाच्या खर्चात थेट ३१ हजार ७७५ कोटी रुपयांची कपात झाली आहे. प्रकल्पाचा खर्च कमी झाल्याने आता एमएमआरडीएला निधी उभारणे सोपे होणार आहे. एमएमआरडीएच्या मुळ आराखड्यानुसार सागरी सेतूवर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी चार मार्गिका आणि आपत्कालीन मार्गिकांचा समावेश होता. मात्र आता सागरी सेतूवर जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका असणार आहेत. तर जोडरस्त्यांवरही जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका बांधण्यात येणार आहेत. त्यामुळे बांधकामाच्या खर्चात मोठी बचत झाल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली.
भविष्यात हा सागरी सेतू विविध रस्त्यांना जोडण्यासाठी सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे जाळे, भविष्यातील रस्ते जोडणीच्या टप्प्यांचाही विचार करून खर्चाचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. त्यामुळे अतिरिक्त खर्च टळला. सेतूच्या रचनेत आणि मार्गिकांची रुंदी कमी केल्याने भूसंपादनाचा बराचसा खर्च कमी झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे मूळ आराखड्यानुसार दोन खांबांवर असलेला सागरी सेतू आता एका खांबांवर उभारण्यात येणार आहे. त्यामुळेही खर्च कमी झाला आहे. एकूणच सागरी सेतूच्या रचनेत अनेक बदल करून एमएमआरडीएने प्रकल्पाचा खर्च ३१ हजार कोटी रुपयांनी कमी केला आहे. आता ८७ हजार कोटी रुपयांचा सागरी सेतू केवळ ५२ हजार कोटी रुपयांमध्ये बांधण्यात येणार आहे
असा आहे प्रकल्प
- एकूण लांबी : ५५.१२ किमी
- मुख्य सागरी मार्ग: २४.३५ किमी
- आंतरबदल मार्ग : ३०.७७ किमी
- उत्तन आंतरबदल मार्ग (९.३२ किमी) – मुंबई महापालिकेच्या दहिसर-भाईंदर जोडरस्त्याला जोडणार
- वसई आंतरबदल मार्ग (२.५ किमी) – पूर्णपणे उन्नत
- विरार आंतरबदल मार्ग (१८.९५ किमी) – वडोदरा – मुंबई द्रुतगती महामार्गाला जोडणार
- जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी तीन मार्गिका, आंतरबदल मार्गांसाठी जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी दोन मार्गिका
अशी होणार निधी उभारणी
- ३७,९९८ कोटी रुपये (७२.१७%) – जायका / बहुपक्षीय निधीकडून प्रस्तावित (पथकर वसुलीच्या आधारे परतफेड)
- १४,६५४ कोटी रुपये (२७.८३%) – महाराष्ट्र सरकार / एमएमआरडीएकडून भांडवली (इक्विटी) स्वरुपात