मुंबईतील गोरेगावमध्ये जय भवानी या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागली. यात आतापर्यंत ७ जणांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी शिंदेंनी आगीमागील कारण सांगत मृतांच्या कुटुंबाला प्रत्येकी ५ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली. तसेच जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकार करेल, असंही जाहीर केलं. ते शुक्रवारी (६ ऑक्टोबर) दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “गोरेगावमध्ये एसआरएची जय भवानी इमारत आहे. त्या इमारतीत आग लागली आहे. मी सातत्याने महापालिका आयुक्त, पोलीस अधिकारी यांच्याशी बोलत आहे. मी त्यांच्याकडून माहिती घेतली आहे. प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या पार्किंगमध्ये कागद आणि कापडाचे गठ्ठे होते. त्यामुळे आग लागली असं प्राथमिक स्तरावर निदर्शनास आलं आहे.”

“मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत”

“झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. ज्यांचा या आगीत मृत्यू झाला आहे त्यांच्याबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून ५ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जखमींचा संपूर्ण उपचार सरकार करेन, असाही निर्णय घेण्यात आला आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नमूद केलं.

https://x.com/mieknathshinde/status/1710162455698227254

हेही वाचा : VIDEO: मुंबईतील गोरेगावमध्ये इमारतीच्या पार्किंगला भीषण आग, ७ जणांचा होरपळून मृत्यू, तर अनेकजण जखमी

धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? एकनाथ शिंदे म्हणाले…

धनुष्यबाण शिंदे गटाला, आता घड्याळ कुणाला मिळेल? या प्रश्नावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आजपासून निवडणूक आयोगासमोर सुनावणी होत आहे. आयोग योग्य तो निर्णय घेईन. लोकशाहीत ज्या बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य निर्णय घेईन.”