राज्यात भाजपा आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी एकत्र येऊन सत्तास्थापन केली. तसेच आगामी निवडणुका एकत्र लढण्याचेही सुतोवाच केले जात आहेत. अशातच ठाण्यात भाजपा-शिंदे गटात वादाची ठिणगी पडली. एकीकडे भाजपाच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी शिंदे गटाला मदत न करण्याचा ठराव मंजूर केला, तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवली. आता या सर्व प्रकारावर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पहिली प्रतिक्रिया दिली. ते रविवारी (११ जून) जम्मू काश्मीर दौऱ्यावर असताना श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “ठाण्यातील वादाची गोष्ट फार लहान आहे. तो विषय आता संपला आहे. महाराष्ट्र भाजपाचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे मला त्यावर अधिक बोलण्याची आवश्यकता वाटत नाही.”

ठाण्यातील नेमका वाद काय?

डोंबिवलीमधील भाजपचे पदाधिकारी नंदू जोशी यांच्यावर विनयभंगचा गुन्हा दाखल झाला. यानंतर स्थानिक भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्री पुत्र व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात दंड थोपटले. तसेच मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत स्थानिक नेत्यांनी जोपर्यंत गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली होत नाही, तोपर्यंत शिंदे गटाला सहकार्य न करण्याचा ठराव संमत केला.

हेही वाचा : मोठी बातमी! शिंदे गटाबरोबरच्या वादानंतर ठाणे व कल्याण मतदारसंघावर भाजपचा दावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यानंतर खासदार श्रीकांत शिंदेंनी काही लोक युतीमध्ये मिठाचा खडा टाकत असल्याचा आरोप केला. तसेच आपला राजीनामा देण्याचीही तयारी दर्शवली. हा वाद चिघळल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यावर स्पष्टीकरण दिलं. मात्र, भाजपच्या नेत्यांनी रविवारी (११ जून) ठाण्यातील मेळाव्यात आक्रमक भूमिका घेतली. तसेच ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदार संघावर दावा केला आहे. ठाणे आणि कल्याण हे दोन्ही लोकसभा मतदार संघ आपले होते आणि यापुढेही राहतील, असा दावा नेत्यांनी करताच मेळाव्याला उपस्थितीत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देऊन त्याला प्रतिसाद दिला.