खड्डे बुजवणाऱ्या मिश्रणाचे उत्पादन पावसामुळे बंद

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : सलग तीन दिवसांच्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील रस्त्यांवरील पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या ‘कोल्ड मिक्स’च्या (शीत मिश्रण) निर्मितीत अडथळा निर्माण झाला आहे. पावसामुळे कोरडी खडी मिळेनाशी झाल्याने पालिकेच्या वरळी येथील कारखान्यात होणारे ‘कोल्ड मिक्स’चे उत्पादन पूर्णपणे थांबले आहे.

पावसाळय़ात रस्त्यांवर पडणारे खड्डे बुजवण्यासाठी डांबरमिश्रित खडीचा वापर केला जात होता. मात्र, खडी टाकल्यानंतर लगेच पाऊस झाल्यास ही खडी वाहून जाते व खड्डे पुन्हा उघडे पडतात. हा अनुभव लक्षात घेऊन पालिकेने ‘कोल्ड मिक्स’ तंत्राचा वापर सुरू केला. ऑस्ट्रिया आणि इस्रायलमधील कंपन्यांकडून घेतलेल्या या मिश्रणाचा वापर खड्डे बुजवण्यात खूप उपयुक्त ठरला. मात्र, तो उपाय खर्चिक असल्यामुळे पालिकेने वरळी येथील कारखान्यात ‘कोल्ड मिक्स’ तयार करण्याचा निर्णय घेतला. आतापर्यंत सुमारे २२५ टन मिश्रण मुंबईतील २४ वॉर्डना पाठवण्यात आले. मात्र गेला आठवडाभर हे उत्पादन थांबवण्यात आले आहे.

हे मिश्रण तयार करण्यासाठी खडी कोरडी लागते. एका यंत्रामध्ये खडी कोरडी करून दुसऱ्या प्लाण्टमध्ये सरकत्या पट्टीवर १०० अंश से. तापमानावर खडी, डांबर आणि परदेशातून आयात केलेले मिश्रण एकत्र केले जाते. त्यानंतर ते थंड करून पिशव्यात भरून साठवले जाते. गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे मात्र खडी कोरडी राहण्यात अडचणी येत आहेत. यंत्रामध्ये खडी कोरडी केली तरी उघडय़ावरील पट्टीवर मिश्रण तयार करताना हवेतील वाढलेल्या बाष्पाच्या संपर्कामुळे खडी ओली होते. ओल्या खडीमध्ये विदेशातील मिश्रण योग्य पद्धतीने एकत्र येत नसल्याने हे उत्पादन थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. दर दिवशी या कारखान्यातून १५ ते २५ टन मिश्रण तयार होते. आतापर्यंत वरळी येथून २२५ टन मिश्रण वॉर्डना पुरवण्यात आले आहे. मात्र रस्त्यांवर खड्डे बुजवण्यासाठी वॉर्डची मागणी वाढली असूनही सध्या पुरवठा थांबला आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींकडून दबाव येत आहे, मात्र शीत मिश्रणाचा पुरेसा पुरवठा नसल्याने वाट पाहावी लागत आहे, असे पालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले.

‘पाऊस थांबताच उत्पादन’

मागचे तीन दिवस खूप पाऊस होता व हवेतील बाष्पाचे प्रमाण वाढले होते. त्यामुळे मिश्रणाचा दर्जा टिकवता आला नसता. पाऊस थांबल्याने पुन्हा उत्पादन सुरू करण्यात येत आहे. थोडा खंड पडला असला तरी उत्तम दर्जाचे मिश्रण तयार केले जाईल, अशी माहिती आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cold mix production stopped completely in bmc factory at worli
First published on: 12-07-2018 at 01:12 IST