मुंबई : कोल्ड प्ले या जगभरात नावाजलेल्या बँडच्या या महिन्यात नवी मुंबईत होणाऱ्या कार्यक्रमाच्या ऑनलाईन तिकिटांचा काळाबाजार झाल्याच्या आरोपाच्या निमित्ताने उच्च न्यायालयात केलली जनहित याचिका उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. त्याचवेळी, तिकिटांच्या अशाप्रकारच्या काळाबाजाराला आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्याचे आदेश देण्याबाबत याचिकाकर्ते सरकारकडे निवेदन सादर करू शकतात, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

धोरण आखणे हा विधिमंडळ किंवा सरकारच्या अधिकारक्षेत्रातील विषय आहे. त्यामुळे, न्यायालय विधिमंडळ किंवा सरकारच्या अधिकारक्षेत्रात हस्तक्षेप करू शकत नाहीत. परिणामी, याचिकाकर्त्यांनी आपल्या मागणीसाठी सरकारकडे दाद मागावी, असे स्पष्ट करून मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती अमित बोरकर यांच्या खंडपीठाने अमित व्यास यांनी केलेली याचिका फेटाळली.

हे ही वाचा… मुंबईकरांनी आणखी किती काळ धुक्याचे वातावरण पाहायचे ? वायू प्रदुषणाची समस्या कायम असल्यावरून उच्च न्यायालयाची विचारणा

दरम्यान, मैफिली, लाइव्ह शो यासारख्या प्रमुख कार्यक्रमांच्या ऑनलाईन तिकिटांच्या विक्रीदरम्यान मोठ्या प्रमाणात अनियमितता होत असल्याचा दावा याचिकाकर्त्यानी सुनावणीच्या वेळी केला होता. दोन महिन्यांपूर्वी कोल्ड प्ले या कार्यक्रमाची तिकिटे बुक माय शो या ऑनलाईन तिकीट विक्री व्यासपीठावरून उपलब्ध करण्यात आली होती. मात्र, या कार्यक्रमाच्या तिकिटांची ऑनलाईन विक्री सुरू केल्यानंतर काही मिनिटांत सर्व तिकीटे विकली गेली. या कार्यक्रमाच्या तिकीटासाठी चाहत्यांनी तब्बल तीन लाखांपर्यंतची रक्कम मोजल्याचेही उघड झाले. या कार्यक्रमाच्या तिकीट विक्रीच्या निमित्ताने ऑनलाईन तिकीट विक्रीत मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचे उघड झाल्याचेही याचिकाकर्त्याच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले होते व या प्रकारांना आळा घालण्यासाठी मार्गदर्शक तत्वे आखण्याचे आदेश देण्याची मागणी केली होती.

हे ही वाचा… मढ मार्वे रस्ता चौपट रुंद होणार, भास्कर भोपी मार्गाचे महापालिका करणार रुंदीकरण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत असल्याचा दावा

आयपीएल क्रिकेट सामन्यांसह २०२३ मधील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यांची तसेच गायक टेलर स्विफ्ट आणि दिलजीत दोसांझ यांच्या संगीत कार्यक्रमांच्या तिकिटांची अवैध मार्गाने विक्री झाल्याचा आरोप देखील याचिकेत करण्यात आला आहे. अशा कार्यक्रमांदरम्यान आयोजक आणि तिकीट विक्री भागीदार दुय्यम तिकीट संकेतस्थळावरून चढ्या दराने तिकिटांची विक्री करून चाहत्यांचे शोषण करत असल्याचा आरोप याचिकाकर्त्यानी केला होता. अशा बेकायदेशीर प्रथांमुळे नागरिकांना सार्वजनिक करमणुकीची समान संधी मिळण्याच्या त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित ठेवले जात आहे. किेबहुना, तिकीट विक्री क्षेत्रातील ठोस नियमांच्या अनुपस्थितीत, बुकमाय शोसारख्या कंपन्या नियमांचे उल्लंघन करत आहेत, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला होता.