मुंबई : अंधेरी पूर्व व पश्चिमेला जोडणारा गोखले पूल वाहतुकीसाठी खुला झाला असला तरी या पुलावरून जाण्यासाठी आता बेस्टच्या बससाठी रहिवाशांना प्रतीक्षा करावी लागत आहे. गेली सात वर्षे हा पूल बंद असून येथील अनेक बसमार्ग खंडित करण्यात आले आहेत.
मुंबईत अनेक विकासकामांमुळे बेस्टचे बसमार्ग वळवले जातात वा खंडित केले जातात. गोखले पुलाचे काम सुरू झाल्यामुळे या मार्गावरून जाणारे दहा बसमार्ग बंद आहेत. तर काही मार्ग पर्यायी रस्त्याने वळविण्यात आले आहेत.
या पुलाच्या पादचारी मार्गाचा भाग २०१८ मध्ये पडला. तेव्हापासून हा पूल बंद करण्यात आला होता. केवळ पादचाऱ्यांना या पुलावरून जाता येत होते. त्यानंतर पुलाच्या दुरुस्तीमुळे अवजड वाहनांना बंदी होती. पूल २०२२ मध्ये पाडून टाकल्यामुळे वाहतूक पूर्णत: बंद झाली. गेल्यावर्षी पुलाची एक मार्गिका सुरू झाली तरी अवजड वाहने आणि बसमार्ग सुरू नव्हते. हे बसमार्ग तब्बल सात वर्षांपासून बंद आहेत. मात्र आता पूल सुरू झाला असून पुलावरील सगळे उंची अटकाव हटवल्यामुळे बसमार्ग पुन्हा सुरू करावे, अशी मागणी अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेने बेस्ट उपक्रमाकडे केली आहे.
गोखले पूल हा पश्चिम उपनगरातील वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. हा पूल बंद केल्यामुळे एक तर ईर्ला पूल वा जोगेश्वरीचा ठाकरे पूल हे दोन पर्याय होते. मात्र, त्यासाठी खूप वळसा घालून जावे लागते. सर्वसामान्य नागरिकांसाठी बेस्ट बस परवडणारे साधन आहे. मात्र, बस नसल्यामुळे रिक्षाने जास्त पैसे मोजून जाण्यापलीकडे सर्वसामान्यांना पर्याय नाही.
पुलावरून बसमार्ग बंद केल्यामुळे विद्यार्थी आणि नोकरदारांना खूप त्रास होतो. त्यामुळे बसमार्ग लवकर सुरू करण्याची आवश्यकता असल्याचे अंधेरी लोखंडवाला रहिवासी संघटनेचे धवल शाह म्हणाले.
दरम्यान, बेस्ट उपक्रमाकडे सध्या बसची कमतरता असल्यामुळे खंडीत केलेले बसमार्ग पुन्हा सुरू करताना बेस्ट उपक्रमावरही ताण येणार आहे. याबाबत बेस्टच्या अधिकाऱ्यांना विचारले असता येत्या सात – आठ दिवसात बसमार्ग नव्याने सुरू केले जातील, त्यादृष्टीने नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
उंची अटकाव हटवले
गोखले पुलाची एक बाजू गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली होती. मात्र तरीही बसगाड्या या पुलावरून जात नव्हत्या. वाहतूक विभागाने या पुलावर उंची अटकाव लावले होते. तसेच पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेच्या गर्डरचे आडवे खांब पुलावर आले असल्यामुळे अवजड वाहने, बसगाड्या, शालेय बस या पुलावरू जाऊ शकत नव्हत्या. मात्र आता पूल सुरू झाल्यानंतर हे सगळे उंची अटकाव (हाइट बॅरिअर) हटवल्याची माहिती पालिकेच्या पूल विभागातील अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या पुलावरून वाहने पुढे पश्चिम द्रूतगती मार्गावर जातात. तिथे अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पश्चिम द्रुतगती मार्ग आणि गोखले पूल दरम्यानही उंची अटकाव लावण्यात आले होते. ते देखील आता हटवण्यात आले आहेत.
गोखले पुलावरून जाणारे बस मार्ग
ए १८० – छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते मालवणी आगार
१८२ – चुनाभट्टी ते मालाड आगार
२२५ – वांद्रे आगार ते दिंडोशी आगार
ए २९० – मरोळ मरोशी बस स्थानक ते गोराई आगार
३२८ – वेसावे यारी मार्ग बस स्थानक ते बामन दाया पाडा
३३६ – विद्याविहार बस स्थानक ते जुहू विलेपार्ले बस स्थानक
ए ३५९ – हिरानंदानी (पवई) ते मालवणी आगार
ए ४२२ – वांद्रे आगार ते विक्रोळी आगार
४२४ – गोरेगांव आगार ते मुलुंड स्थानक (पश्चिम)
ए ५३३ – अंधेरी स्थानक (पश्चिम) ते एपीएमसी वाशी सेक्टर १९