मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (एकनाथ शिंदे गट) पक्षातील काही नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासाठी काम केले नाही किंवा महाविकास आघाडीसाठी काम केले, अशा तक्रारी भाजपच्या उच्चस्तरीय बैठकीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत करण्यात आल्या, असे सूत्रांनी सांगितले.

लोकसभेसाठी जागावाटप आणि उमेदवारांची घोषणा उशिरा झाल्याने प्रचारासाठी अवधी मिळाला नाही आणि गोंधळ झाल्याने विधानसभेसाठी महायुतीचे जागावाटप आणि उमेदवार निश्चिती लवकर व्हावी, अशी मागणीही प्रदेश नेत्यांनी वरिष्ठांकडे केली आहे.

हेही वाचा >>>सरकारी अधिकाऱ्यांच्या दुटप्पी वृत्तीमुळेच बेकायदा बांधकामे – उच्च न्यायालय

मात्र बैठकीत पवार व शिंदे गटातील नेत्यांबाबत भाजप नेत्यांनी कोणत्याही तक्रारी किंवा उल्लेखही केला नाही. महायुतीतील पक्षांमध्ये भांडणे लावण्यासाठी हा अपप्रचार केला जात आहे, असे स्पष्टीकरण प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत केले. भाजपचे महाराष्ट्रासाठीचे प्रभारी भूपेंद्र यादव, सहप्रभारी अश्विनी वैष्णव, सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह प्रदेश विस्तारित समितीतील नेत्यांच्या बैठकीत शुक्रवार व शनिवारी रात्री चर्चा झाली.

विधानसभेच्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात येत असून लोकसभा निवडणुकीत त्याठिकाणी महायुतीच्या उमेदवाराला मिळालेली मते, आलेल्या अडचणी व वाद, महायुतीतील आमदार, पदाधिकारी व नेत्यांच्या भूमिका आणि त्यांनी काम केले किंवा नाही, मतदारसंघातील राजकीय परिस्थिती, विधानसभेत जिंकून येऊ शकेल, असे संभाव्य उमेदवार आदी मुद्द्यांवर दोन दिवस चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

हेही वाचा >>>गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या, २१ जुलैपासून रेल्वे आरक्षण सुरू होणार

काही मतदारसंघांत फटका

या बैठकांमध्ये भाजपच्या प्रदेश नेत्यांनी शिंदे व पवार गटातील नेत्यांनी योग्यप्रकारे काम न केल्याच्या आणि विरोधात काम केल्याच्याही तक्रारी केंद्रीय नेत्यांकडे केल्या. अजित पवार गटातील नेत्यांच्या भूमिका, असहकार व विरोधामुळे दिंडोरी, सातारा, पुणे, सांगली, सोलापूर व बुलडाणा मतदारसंघात तर शिंदे गटातील नेत्यांमुळे जालना व पालघरमध्ये फटका बसल्याचा आरोप करण्यात आला. यासंदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यास विधानसभा निवडणुकीतही वाद होतील व महायुतीला फटका बसेल, अशी भीती काही नेत्यांनी व्यक्त केल्याचे सूत्रांनी नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

योजनांच्या प्रसिद्धीचे नियोजन

भाजपच्या बैठकीत विधानसभा मतदारसंघनिहाय राजकीय परिस्थिती व अन्य मुद्द्यांवर चर्चा झाली आहे. राज्यातील प्रत्येक निवडणूक केंद्रापर्यंत पक्षाची प्रचारयंत्रणा, केंद्र व राज्य सरकारचे निर्णय, राज्य सरकारने अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या योजना व निर्णयांचा प्रचार, त्यांचे लाभ व माहिती जनतेपर्यंत पोचविण्यासाठीचे नियोजन आदी बाबींवर आणि पुणे येथे रविवारी होणाऱ्या अधिवेशनाच्या तयारीसाठी बैठकांमध्ये चर्चा सुरु असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.