मुंबई : पालिकेचा बहुप्रतीक्षित अशा मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा काही भाग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर आता या मार्गावरील गैरसोयींची समाजमाध्यमांवर चर्चा होऊ लागली आहे. सागरी किनारा मार्गावर सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याला काही ठिकाणी तडे गेले आहेत, तर हाजीअली येथे पादचाऱ्यांसाठी असलेल्या भूमिगत मार्गामध्ये समुद्राच्या भरतीचे पाणी येत असल्याने उलटसुलट चर्चा होऊ लागली आहे.

दरम्यान, सागरी किनारा मार्गावरील असमान मार्गिकांवरूनही नवा वाद उद्भवला आहे. मरिन लाइन्स येथे दोनच मार्गिका असल्यामुळे सागरी किनारा मार्गातून बाहेर पडताच वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. पालिका अधिकाऱ्यांनी मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. धर्मवीर स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाची वरळी – मरिन ड्राइव्ह अशी दक्षिण वाहिनी मार्गिका १२ मार्चपासून सर्वसामान्यांसाठी खुली झाली. एक महिन्यानंतर या मार्गावरील गैरसोयींची आता समाजमाध्यमांवर चर्चा सुरू आहे.

हेही वाचा…खंडणीप्रकरणातून दाऊदच्या पुतण्यासह तिघांची निर्दोष सुटका

सागरी किनारा मार्गावर मरिन ड्राइव्ह येथे बोगद्यातून बाहेर पडत असलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावर तडे गेल्याची छायाचित्रे समाजमाध्यमांवर टाकण्यात आली आहेत. दरम्यान, हे तडे अत्यंत सूक्ष्म असून ते इपॉक्सी मिश्रणाने बुजविण्यात आलेले आहेत, असा खुलासा करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे हाजीअली परिसरात पादचारी भूमिगत मार्गावर बुधवारी पहाटे समुद्राच्या भरतीचे पाणी शिरल्यामुळे हा मार्ग बंद करण्याची वेळ आली होती. सामाजिक कार्यकर्ते झोरू भतेना यांनी याबाबतचा मजकूर समाज माध्यमांवर टाकला आहे. बुधवारी समुद्रात ४.९ मीटर उंचीच्या लाटा उसळल्या होत्या. बुधवारी दुपारनंतर पाणी ओसरल्यानंतर हा पादचारी मार्ग सुरू करण्यात आला. उन्हाळ्यात ही गत, तर पावसाळ्यात काय परिस्थिती निर्माण होईल अशी विचारणा समाजमाध्यमांवरून होऊ लागली आहे.

हेही वाचा…पंड्या बंधूंना बदनामीची धमकी

सागरी किनारा मार्गावर एकूण २० ठिकाणी असे भूमिगत मार्ग बांधण्यात येणार आहेत. सागरी किनारा मार्गावर वाहनांची वेग मर्यादा जास्त असल्यामुळे रस्ता ओलांडण्यासाठी हे भूमिगत मार्गच पादचाऱ्यांना वापरावे लागणार आहेत. दरम्यान, मलनिस्सारण वाहिन्यांची, तसेच पर्जन्यजलवाहिन्यांची कामे अद्याप पूर्ण झालेली नसल्यामुळे हे पाणी ओसरत नसल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. ही कामे पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर पाणी साचणार नाही, त्याचा वेळीच निचरा होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.