जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, नोरा फतेही यांनाही बाधा
मुंबई : गेल्या महिनाभरात सिनेतारकांचा पाटर्य़ामधील सहभाग, सार्वजनिक ठिकाणांना दिलेल्या भेटींमध्ये वाढ झाली आहे. त्याचबरोबर नाताळच्या आणि नवीन वर्षांच्या निमित्ताने आयोजित समारंभांमधील उपस्थिती बॉलीवूडमधील अनेक कलावंतांना त्रासदायक ठरू लागली आहे. अभिनेता जॉन अब्राहम, मृणाल ठाकूर, नोरा फतेह यांना करोनाची बाधा झाल्यामुळे बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे.
हिंदूी चित्रपट अभिनेता जॉन अब्राहम आणि त्याची पत्नी प्रिया रंचल यांना करोनाची लागण झाली आहे. ते दोघेही आपल्या मुंबईच्या घरी गृहविलगीकरणात आहेत. सोमवारी सकाळी जॉन अब्राहम याने समाजमाध्यमावरून आपल्यासह पत्नीला करोनाची लागण झाल्याचे जाहीर केले. ‘सत्यमेव जयते २’ या नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावली होती. तीन दिवसांपूर्वी आपण एका व्यक्तीच्या संपर्कात आलो होतो. या व्यक्तीला करोनाची बाधा झाल्याचे समजल्यानंतर ताबडतोब आपण व पत्नी प्रियाने करोना चाचणी केल्याचे त्याने नमूद केले. करोना पॉझिटिव्ह आल्याचे कळताच दोघेही कुणाच्याही संपर्कात आलो नसून घरीच विलगीकरणात असल्याचेही त्याने स्पष्ट केले. तसेच दोघांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असून आम्हाला करोनाची सौम्य लक्षणे असल्याचीही माहिती त्याने दिली.
अभिनेत्री मृणाल ठाकूर, नोरा फतेही आणि शिल्पा शिरोडकर यांनाही करोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री मृणाल ठाकूरला करोनाची सौम्य लक्षणे असल्याचे तिने स्पष्ट केले. मृणाल ठाकूर ‘जर्सी’ या आपल्या सिनेमाच्या जाहिरातीसाठी अभिनेता शाहिद कपूरसह सार्वजनिक ठिकाणी हजेरी लावत होती असे सूत्रांकडून समजले. परिणामी तिनेही आपल्या संपर्कात आलेल्यांना करोना चाचणी करण्याचे आव्हान केले आहे. ‘जर्सी’ हा शाहिद कपूर आणि मृणाल ठाकूर यांचा चित्रपट ३१ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता, परंतु करोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलल्याचे समजते. नृत्यागंना नोरा फतेही हिलाही करोना झाला असून तीही विलगीकरणात आहे. तसेच अभिनेत्री शिल्पा शिरोडकर यांनाही दुबई येथे करोनाची लागण झाली आहे.
मागच्या आठवडय़ात अभिनेता अर्जुन कपूर व त्याची बहीण अन्शुला कपूर, तसेच रिया कपूर आणि त्यांचे पती करन बुलानी यांना करोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवडय़ात या मंडळींनी सार्वजनिक पाटर्य़ामध्ये हजेरी लावली होती. सर्व जण डॉक्टरांच्या सल्ल्याने विलगीकरणात असल्याचे समजते.