काँग्रेस नेत्यांचं शिष्टमंडळ आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे. संध्याकाळी ५ वाजता ही भेट होणार असून यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच आठवड्यात होईल, असे संकेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहेत. तसंच राज्यात १० मार्चनंतर मोठे बदल दिसतील असं सूचक विधानही केलं आहे. त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष आहे. दरम्यान महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी यासंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाष्य केलं.

शिष्टमंडळात बाळासाहेब थोरात आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि नाना पटोले सहभागी असतील. महाविकास आघाडीतील मतभेदांसंबधी विचारलं असता ते म्हणाले की , “जरी एका पक्षाचं सरकार असलं तरी अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आज तीन पक्षांचं सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत”.

नाना पटोलेंनी दिले राज्यातील राजकीय भूकंपाचे संकेत; म्हणाले, “१० मार्च रोजी…”

काँग्रेससोबत दुजाभाव केला जात आहे का? अशी विचारणा केली असता ते म्हणाले, “असं काही मी म्हणणार नाही. प्रश्न आहेत हे मात्र आम्ही मान्य करतो. निधीच्या बाबतीतही प्रामुख्याने प्रश्न असून आज ते सोडवले जातील”.

संजय राऊतांना पाठिंबा

“तपास यंत्रणांचा उपयोग राजकारणासाठी केला जात आहे. कुटुंबातील मुलांपर्यंत, सदस्यांपर्यंत हे राजकारण पोहोचणं महाराष्ट्रातील जनतेला पटणार नाही. संजय राऊत यांचा रोष हा असाच आहे. महाविकास आघाडी टिकू नये यासाठीच हे प्रयत्न सुरु आहेत. भाजपाच्या कार्यपद्धतीविरोधात जो रोष आहे त्याच्यासोबत आम्ही आहोत,” असं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नाना पटोले यांनी राज्यात १० मार्च रोजी राज्यात मोठे फेरबदल होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “१० मार्चनंतर काय बदल होणार आहे याबद्दल पक्षाचे अध्यक्षच सांगू शकतील. तेच याबद्दल स्पष्ट सांगू शकतात. ते नेमकं कशा पद्दतीने बोलले याची मला माहिती नाही”.