मधु कांबळे

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुका शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याबरोबर आघाडी करुन लढविण्याची तयारी ठेवून, जागावाटपात मात्र काँग्रेसने आक्रमक रणनीती आखली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेत, आघाडीच्या जागवाटपात २७ ते २८ जागांवर दावा करण्याची तयारी काँग्रेसने केली आहे.

राज्यात भाजपचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडी मजबूत करण्याचा प्रयत्न केला जाईल. परंतु जागावाटपात फरपट होऊ द्यायची नाही, सन्मानपूर्वक जागावाटप झाले तर, आघाडीबरोबर, अन्यथा स्वतंत्रपणे निवडणुका लढविण्याच्या पर्यायी योजनेवरही पक्षात विचार सुरु आहे. बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार राज्यातील १९ ते २० मतदारसंघांत काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. त्यानुसार काँग्रेसने जागावाटपाबाबत आक्रमक राहण्याचे ठरविले आहे. राज्याचे प्रभारी एच.के. पाटील यांच्या उपस्थितीत मंगळवारी प्रदेश काँग्रेसच्या गाभा समितीची (कोअर कमिटी) बैठक झाली. बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील आदी नेते उपस्थित होते.

या जागांसाठी आग्रही..

बैठकीत ४८ लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थतीचा आढावा घेण्यात आला. मागील २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसने चंद्रपूरची एकच जागा जिंकली होती. परंतु महाविकास आघाडीत २७ ते २८ जागा मिळाव्यात असा आग्रह धरण्याचे बैठकीत ठरल्याचे सांगण्यात आले. प्रामुख्याने अमरावती, बुलढाणा, रामटेक, नांदेड, हिंगोली, सांगली, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, रावेर, सोलापूर, लातूर, पुणे, दक्षिण मुंबई, दक्षिण-मध्य, उत्तर मध्य मुंबई, भिवंडी, या मतदारसंघांवर आग्रही दावा सांगितला जाणार आहे. विदर्भात काँग्रेस व भाजपचेच वर्चस्व आहे, त्यामुळे भंडारा-गोंदिया ही एक जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडावी, बाकीच्या सर्व जागा काँग्रेसने मागाव्यात, असाही बैठकीत सूर होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोकणात काँग्रेसची अवस्था बिकट आहे, त्यामुळे या भागातील जागांवर फार आग्रह धरायचा नाही, भिवंडी मतदारसंघ मात्र सोडायचा नाही, असे ठरले आहे. पुणे मतदारसंघ हा काँग्रेसचाच आहे, या मतदारसंघावर तडजोड करायची नाही, अशी ठाम भूमिका घेतली जाणार आहे. येत्या शुक्रवारी काँग्रेसचे वरिष्ठ नेते व पदाधिकारी यांची पुन्हा बैठक होणार आहे. त्यात जागावाटपाचे काँग्रेसचे सूत्र ठरविले जाणार असल्याचे समजते.