शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांविरोधात तक्रार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजप आणि शिवसेनेत सतत कुरघोडी सुरू असतानाच शिवसेनेचे राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्यावर झालेल्या आरोपांची तक्रार ऐकून घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी काँग्रेसच्या शिष्टमंडळाला वेळ देऊन शिवसेनेला सूचक इशारा दिला आहे.

आरे कॉलनीत व्यायामशाळेचे अनधिकृत बांधकाम, सुमारे २० एकर जागा हडप करणे तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत केलेला घोळ यावरून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी वायकर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. वायकर यांनी हे आरोप फेटाळले असले तरी निरुपम यांनी वायकर यांच्या विरोधात लोकायुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. निरुपम यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन वायकर यांच्या विरोधातील तक्रारी आणि त्याच्या पुराव्यांचा बाडच सादर केला. निरुपम यांच्यासह सुरेश शेट्टी, वर्षां गायकवाड, चरणजितसिंह सप्रा, सचिन सावंत, अमिन पटेल आदींचा शिष्टमंडळात समावेश होता.

भाजप आणि शिवसेनेत सध्या चांगलेच बिनसले आहे. शिवसेनेवर कुरघोडी करण्याची संधी भाजपकडून वाया घालविली जात नाही. शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांच्या विरोधात तक्रार करण्याकरिता वेळ देण्याची निरुपम यांची मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली. यावरून शिवसेनेला मुख्यमंत्र्यांनी सूचक इशारा दिला आहे. वायकर हे ‘मातोश्री’च्या निकटचे मानले जातात. जमीन हडप करणे, बेहिशेबी मालमत्ता तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेत झालेला घोळ याची चौकशी करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे निरुपम यांनी सांगितले. भाजपच्या मंत्र्यांवर आरोप होत असतानाच शिवसेनेच्या राज्यमंत्र्यावर  निरुपम यांनी आरोप केल्याने भाजपकडून त्याच्या शिताफीने वापर केला जाण्याची शक्यता आहे.

व्यायामशाळेच्या जागेत बेकायदा बांधकाम?

व्यायामशाळेच्या जागेत बांधण्यात आलेला अनधिकृत मजला तात्काळ पाडण्यात यावा, अशी मागणी निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. वायकर यांनी मतदारसंघात जवळपास १५ व्यायामशाळा बांधून त्यावर अनधिकृतपणे पहिला मजला बांधल्याकडेही निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

 

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress delegation meet to devendra fadnavis
First published on: 01-07-2016 at 03:00 IST