विधान परिषदेच्या आठ जागांसाठी होणारी निवडणूक एकत्रित लढविण्याचा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतला असून, कोणी किती जागा लढवायच्या याबाबत सोमवारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक होणार आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत काँग्रेसला जागा बदलून हव्या असून, राष्ट्रवादी मात्र ‘जैसे थे’साठी आग्रही आहे.

आठपैकी एक जागा शिवसेनेची निवडून येणार हे निश्चित. उर्वरित सातपैकी मुंबई, धुळे-नंदूरबार, कोल्हापूर आणि नागपूर या चार जागा काँग्रेसने तर सोलापूर, नगर आणि बुलढाणा-अकोला या तीन जागा राष्ट्रवादीने लढवाव्यात, असा राष्ट्रवादीचा प्रस्ताव आहे. पण नगर किंवा बुलढाणा-अकोला यापैकी एक जागा मिळावी, अशी काँग्रेसची मागणी आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीत काही जागांची आदलाबदल व्हावी, अशी आमची मागणी असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी सांगितले. यापूर्वीच्या सूत्रानुसार तीन जागांवर आमचा हक्क असल्याचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केला.
सोमवारी होणाऱ्या आघाडीच्या बैठकीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे चव्हाण व तटकरे यांनी सांगितले. नगरची जागा राष्ट्रवादीला सोडण्यास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सक्त विरोध दर्शविला आहे.