सातव यांच्या पश्चात काँग्रेस पक्ष कुटुंबीयांच्या पाठीशी ; डॉ. प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी

राजीव सातव यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षातील साऱ्यांनाच धक्का बसला होता.

मुंबई  :  राजीव सातव यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला विधान परिषद पोटनिवडणुकीत उमेदवारी देऊन पक्ष सातव कु टुंबीयांच्या पाठीशी ठाम असल्याचा संदेश काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी दिला आहे.

शरद रणपिसे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत काँग्रेस पक्षात अनेक जण इच्छुक होते. रणपिसे हे दलित समाजातील असल्याने या जागेवर दलित समाजातील नेत्यालाच संधी द्यावी, अशी मागणीही झाली होती. अनेक माजी मंत्री, नेते या जागेसाठी आग्रही होते. परंतु पक्षाने राजीव सातव यांची पत्नी डॉ. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी दिली. राज्यसभेसाठी रजनी पाटील आणि विधान परिषदेसाठी डॉ. प्रज्ञा सातव यांच्यामुळे काँग्रेस पक्षाने दोन महिलांना संधी दिली आहे.

राजीव सातव यांच्या अकाली निधनाने काँग्रेस पक्षातील साऱ्यांनाच धक्का बसला होता. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असलेल्या राजीव सातव यांचे पक्षातील सर्वच नेत्यांशी उत्तम संबंध होते. सातव यांच्या निधनानंतर झालेल्या शोकसभेत सहभागी झालेल्या राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काँग्रेस पक्ष सातव यांच्या कु टुंबीयांच्या पाठीशी ठाम उभा राहील, अशी ग्वाही दिली होती. राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांची आई, पत्नी व मुलांची पक्षाध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी दिल्लीत भेट घेऊन सांत्वन के ले होते.

राजीव सातव यांच्या निधनाने रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर सातव यांच्या पत्नीला उमेदवारी देण्याची पक्षात चर्चा होती. डॉ. प्रज्ञा सातव यांनीही तेव्हा पक्षाकडे इच्छा व्यक्त के ली होती. परंतु राज्यसभेत अनुभवी नेत्याची गरज असल्याने रजनी पाटील यांना संधी देण्यात आली. राज्यसभेत संधी न मिळाल्याने विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी विचार व्हावा, अशी विनंती प्रज्ञा सातव यांनी पक्षाकडे के ली होती.

राज्यातील अनेक दिग्गज नेते इच्छुक असतानाही काँग्रेसने सातव यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर के ली. राहुल व प्रियंका गांधी यांनी सातव कु टुंबीयांच्या पाठीशी पक्ष उभा राहील अशी ग्वाही दिली होती. यानुसारच पक्षाने सातव यांच्या पत्नीच्या नावाचा विचार के ला.

दंतवैद्यक असलेल्या डॉ. प्रज्ञा सातव यांना राजकीय अनुभव नसला तरी राजीव सातव यांच्या निधनानंतर त्यांची प्रदेश काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. देगलूरचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या निधनानंतर पक्षाने त्यांच्या मुलालाच पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली होती. नुकत्याच झालेल्या या पोटनिवडणुकीत अंतापूरकर हे विजयी झाले. विधान परिषद पोटनिवडणुकीत पक्षाने सातव यांच्या पत्नीला संधी दिली आहे.

दोन्ही उमेदवारी मराठवाडय़ाला

राजीव सातव यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने बीडच्या रजनी पाटील यांना उमेदवारी दिली होती. राजीव सातव हे हिंगोलीचे. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली. लागोपाठ दोन पोटनिवडणुकांमध्ये दोन्ही मराठवाडय़ातील महिलांनाच काँग्रेसने संधी दिली आहे. बीडमध्ये काँग्रेसची पाटी अगदीच कोरी आहे. हिंगोलीत राजीव सातव यांच्यामुळे काँग्रेसची ताकद होती.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Congress nominate pradnya rajeev satav for maharashtra mlc bypolls zws

Next Story
केरोसीन अनुदानाचे वितरण बँक खात्यांच्या माध्यमातून- अनिल देशमुख
ताज्या बातम्या