मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाच्या संगनमताने केलेली मतचोरी आणि महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या मतदार यादीतील घोळ देशासमोर आणला आहे. २०२४ च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या ४ महिन्यांत राज्यात ४१ लाख मतदार वाढणे ही गंभीर बाब आहे. त्याचप्रमाणे १६ ते १९ ऑक्टोबर या चार दिवसात ६ लाख ५५ हजार ७०९ मते कशी वाढली, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी निवडणूक आयोगाची आकडेवारी सादर करीत उपस्थित केला.
निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात ९ कोटी २९ लाख ४३ हजार ८९० नोंदणीकृत मतदार होते. यानंतर विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्रीय निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार यादीच्या छाननीनुसार ३० ऑगस्ट २०२४ पर्यंत ९ कोटी ५३ लाख ७४ हजार ३०२ एवढी मतदारसंख्या झाली. याचा अर्थ या कालावधीत २४ लाख मतदार वाढले. त्यानंतर मतदार नोंदणी प्रक्रिया राज्यात सुरूच होती. १५ ऑक्टोबर २०२४ रोजी मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राची निवडणूक जाहीर झाल्यानंतर राज्यात ९ कोटी ६३ लाख ६९ हजार ४१० मतदार आहेत हे जाहीर केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यपद्धतीप्रमाणे उमेवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या तारखेच्या १० दिवस अगोदर नवीन मतदार नोंदणी सुरू ठेवली जाते आणि त्यानंतर साधारणपणे ८ दिवस या अर्जाची छाननी करून अंतिम पुरवणी मतदार यादी ही उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी जाहीर केली जाते.
त्यानुसार २९ ऑक्टोबरला निवडणूक अर्ज भरण्याचा पहिला दिवस होता, त्याच्या १० दिवस अगोदर म्हणजे १९ ऑक्टोबरपर्यंत मतदार नोंदणी सुरू ठेवण्यात आली होती, ही नोंदणी १६ ते १९ ऑक्टोबर या चार दिवसांच्या कालावधीत सुरू होती आणि त्यानंतर ८ दिवस नोंदणी थांबवली व छाननी करून अंतिम पुरवणी मतदार यादी जाहीर करण्यात आली, त्याचा आकडा ३० ऑक्टोबर २०२४ रोजी जाहीर झाला आणि तो ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ होता, याचा अर्थ चार दिवसात मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी झाली, हे अत्यंत संशायास्पद आहे, त्याचे उत्तर निवडणूक आयोगाने द्यावे, असे सचिन सावंत म्हणाले.
हीच सदोष मतदार यादी १ जुलै २०२५ पर्यंत वाढवण्यात आल्याने या यादीवर शंका निर्माण झाली आहे. तसेच विश्वासार्प्रहतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही मतदार यादी विरोधी पक्षांना पहायला सुद्धा दिली जात नाही, त्यावरचे आक्षेप नोंदवण्याची संधीही देण्यात येणार नाही, हे लोकशाही प्रक्रियेला घातक आहे, त्यामुळे विरोधी पक्षाने घेतलेली भूमिका योग्य आहे, असेही सचिन सावंत म्हणाले.