ठाणे ते दिवा पाचवा, सहावा मार्ग आणि उरण मार्गिका सेवेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : नवीन वर्षांत मुंबईकरांचा आणि विशेष करून उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे. ठाणे ते दिवा पाचवा, सहावा मार्ग, तसेच खारकोपर ते उरण मार्गिका सेवेत दाखल होणार आहे. तसेच लोकलचे वेळापत्रक बिघडवणारे कळवा रेल्वे फाटक बंद होऊन उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होत असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. पश्चिम रेल्वे उपनगरीय प्रवाशांच्या सेवेतही आठ नवीन लोकल फेऱ्यांची भर पडणार आहे. याशिवाय मुंबईकरांसाठी बेस्टच्या विजेवर धावणाऱ्या आणखी २,१०० वातानुकूलित बस मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहेत. यात दुमजली बसचा समावेश असेल, अशी माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. त्यामुळे आगामी वर्ष प्रवाशांच्या दृष्टीने सुखकारक ठरणार आहे.

पश्चिम रेल्वेवर आठ फेऱ्या

पश्चिम रेल्वेकडून सामान्य लोकल फेऱ्यांत काहीशी वाढ करण्याचा विचार केला जात होता. त्यानुसार नवीन वर्षांत चर्चगेट ते बोरिवली, विरारदरम्यान आणखी आठ फेऱ्यांची भर पडणार आहे. यामध्ये तीन जलद मार्गावर आणि पाच लोकल फेऱ्या धिम्या मार्गावर चालवण्यात येतील.

बेस्टच्या २,१०० वातानुकूलित बस

 मुंबईकरांच्या सेवेत आणखी २,१०० विजेवर धावणाऱ्या वातानुकूलित बस या नव्या वर्षांत दाखल करण्याचे उद्दिष्ट बेस्ट उपक्रमाने ठेवले आहे. यामध्ये दुमजली वातानुकूलित बसचाही समावेश आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात विविध प्रकारच्या ३,८०० बस आहेत. याशिवाय प्रवासात तिकीट किंवा पास काढताना लागणाऱ्या रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा, तसेच प्रवाशांचा वेळ वाचण्यासाठी बेस्ट उपक्रम ‘एक सामायिक कार्ड’ (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) योजना सुरू करीत आहे. ही सेवा १५ जानेवारीपर्यंत सुरू होईल. याद्वारे एक सामायिक कार्ड उपलब्ध होणार असून यामधून तिकिटाचे पैसे अदा करून बेस्टबरोबरच मेट्रो, रेल्वेतूनही प्रवास करता येणार आहे. देशभरात प्रवासी वाहतुकीसाठी या कार्डचा वापर करता येणार आहे.

नव्या मार्गिका, उड्डाणपूल सेवेत

  • गेल्या दहा वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या ठाणे ते दिवा पाचव्या, सहाव्या मार्गाचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट मुंबई रेल्वे विकास महामंडळ व मध्य रेल्वेने निश्चित केले आहे. त्यासाठी मोठमोठे मेगाब्लॉकही घेतले जात आहेत.
  • या मार्गामुळे एकाच मार्गावरून जाणाऱ्या मेल, एक्स्प्रेससाठी या पट्टय़ात स्वतंत्र मार्गिका उपलब्ध होईल. त्यामुळे लोकलचे वेळापत्रकही सुधारेल. याशिवाय रेल्वे फाटक खुले आणि बंद करण्यामुळे लोकलच्या वेळापत्रकावर परिणाम होतो. अशी फाटके बंद करून त्याठिकाणी स्थानिक पालिकांच्या मदतीने रेल्वे उड्डाणपूल उभारले जात आहेत.
  • कळवा येथील रेल्वे उड्डाणपुलाचे कामही ऑक्टोबर २०२१ मध्ये पूर्ण झाले. ठाणे पालिकेकडून हा पूल वाहनचालकांसाठी नव्या वर्षांत खुला केला जाणार आहे.
  • रखडलेल्या नेरुळ ते बेलापूर ते उरण उपनगरीय रेल्वे मार्गाला गती दिली जात असून, यातील खारकोपर ते उरण दुसरा टप्पा सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर संपूर्ण उपनगरीय मार्गिका लोकलसाठी उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पासाठीचा खर्च एक हजार रुपये कोटींनी वाढून सुमारे १५०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consolation suburban train passengers ysh
First published on: 01-01-2022 at 00:02 IST