कल्याण : ठाणे ते मुलुंड रेल्वे स्थानकांच्या दरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याचा फटका सोमवारी कामाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकडे जाणाऱ्या डोंबिवली, कल्याणमधील प्रवाशांना बसला. घामाच्या धारांनी अगोदरच हैराण झालेले प्रवासी, त्यात लोकल उशिरा धावत असल्याचे ऐकून संतप्त झाले. सिग्नलमधील बिघाडाने लोकल अनियमित वेळेने धाऊ लागल्याने आणि काही लोकल जागच्या जागी थांबल्याने कल्याण, डोंबिवली ही सर्वाधिक प्रवासी वर्दळीची रेल्वे स्थानके प्रवाशांनी तुडुंब भरली होती.
कामावर जाण्याचा पहिलाच दिवस आणि ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. कल्याणकडून मुंबईकडे जाणाऱ्या बहुतांशी लोकल संथगती, काही लोकल जागीच थांबल्या होत्या, तर काही लोकल संथगतीने धावत होत्या. प्रस्तावित वेळेतील लोकल एक तास उशिराने धावत होत्या. त्यामुळे प्रवासी मिळेल त्या लोकलने मुंबईकडे जाणारी लोकल पकडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे कल्याणकडून मुंबईकडे जाणारी प्रत्येक लोकल प्रवाशांची खचाखच भरून जात होती.
हेही वाचा…मोदींच्या नेतृत्वाखाली देश हुकूमशाहीकडे ! कल्याणच्या सभेत शरद पवारांची टीका
अंगाची काहिली, त्यात घामाच्या धारा आणि त्यात लोकल उशिरा त्यामुळे प्रवाशांचा तिळपापड झाला होता. दरवाजे, खिडकीला लटकून प्रवासी प्रवास करत होते. महिला प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा होत होती. अनेक प्रवाशांनी पाच ते सहा प्रवाशांनी खच्चून भरलेल्या लोकल सोडूनही लोकलमध्ये गर्दीमुळे चढता येत नसल्याने घरी जाणे पसंत केले. कल्याण ते ठाणे रेल्वे स्थानकांच्या दरम्यानच्या कोपर, मुंब्रा, दिवा, कळवा रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशांची गर्दी उसळली होती. वातानूकुलित लोकलचे दरवाजे प्रवाशांच्या दारातील गर्दीने लागत नसल्याने रेल्वे सुरक्षा जवान प्रवाशांना डब्यात लोटून दरवाजे लावून घेण्याचा प्रयत्न करत होते. प्रवाशांचा उद्रेक नको म्हणून रेल्वे स्थनकांमधील रेल्वे सुरक्षा बळाच्या जवानांची संख्या वाढविण्यात आली होती.
एक तासानंतर ठाण्या जवळील सिग्नल यंत्रणा सुस्थितीत झाली तरी त्यानंतर लोकल एक तास उशिराने धावत होत्या. त्याचा फटका मुंबईत परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसला. अनेक विद्यार्थी सुट्टीकालीन काही कोर्स मुंबईत जाऊन करत आहेत. त्या विद्यार्थ्यांचीही परवड झाली.
हेही वाचा…ठाणे जिल्ह्यात परराज्यातून येणारे लोंढे आवरा – राज ठाकरे
पश्चिम रेल्वेवर मध्य रेल्वेपेक्षा अधिक लोकल धावत असुनही त्या लाईनवर कधी असे बिघाड होत नाहीत, मध्य रेल्वेच्या पाचवीला असे बिघाड का पुजले आहेत असा संतप्त प्रश्न प्रवाशी करत होते.