नवनियुक्त पोलीस आयुक्तांचे मुंबईकरांना आवाहन

मुंबई : पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळताना संजय पांडे यांनी कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला होता. त्याच धर्तीवर आता पोलीस आयुक्तपदाची धुरा सांभाळल्यानंतर पांडे यांनी मुंबईकरांना विश्वासात घेण्यासाठी साद घातली आहे.

मुंबई पोलीस दलाच्या कार्यपद्धतीबाबत सुधारणा सुचवायची असल्यास थेट संपर्क साधावा असे आवाहन करीत पांडे यांनी आपला खासगी मोबाइल क्रमांक जाहीर केला आहे. दरम्यान, भविष्यात नवनियुक्त आयुक्त मुंबईकरांबरोबर समाजमाध्यमांवरूनही थेट संपर्क साधण्याची शक्यता आहे.

मुंबई शहराशी माझे एक भावनिक नाते जुळलेले आहे. गेली जवळपास ३० वर्षे मी या शहरात आणि पोलीस दलात विविध पदांवर काम केले आहे. मुंबई पोलिसांची स्वत:ची एक गौरवशाली परंपरा आणि इतिहास आहे. किंबहुना मुंबईच्या पोलिसांची नेहमीच स्कॉटलंडच्या पोलिसांशी तुलना होत आली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस दलाचा आयुक्त या नात्याने मुंबईकरांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. हे माझ्यासाठी गौरवास्पद आणि अभिमानाचे आहे, असे पांडे यांनी मुंबईकरांना पाठवलेल्या संदेशात नमूद केले आहे.

 कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने आपल्यालाही अनेक अडचणी भेडसावत असणार, त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या कामकाजात काही सुधारणा होणे आवश्यक वाटत असल्यास व त्याबाबत आपल्या काही सूचना असल्यास ९८६९७०२७४७ या मोबाइल क्रमांकावर जरूर कळवा. अनेक वेळा अगदी छोटय़ा सूचनाही मोठे बदल घडवून आणू शकतात. त्यामुळे योग्य सूचनांची दखल घेऊन त्यानुसार बदल करण्याचा निश्चितच प्रयत्न केला जाईल, असे त्यांनी नमूद केले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई पोलीस नागरिकांच्या मदतीसाठी, संरक्षणासाठी आणि एकूणच कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी २४ तास सज्ज असतील, असे आश्वासन पांडे यांनी दिले. पांडे पोलीस महासंचालक असताना समाजमाध्यमांवर सक्रिय होते.