मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या उपनगरीय रुग्णालयांमधील अतिदक्षता विभाग, कॅथलॅब, रक्तशुद्धीकरण केंद्र, रक्तपेढ्या खाजगी आरोग्यसेवा कंपन्यांना कंत्राटी पद्धतीने चालविण्यासाठी देण्याच्या निर्णयानंतर आता मुंबई महानगरपालिकेने उपनगरीय रुग्णालयातील रुग्णांना नाश्त्यापासून रात्रीचे जेवणसुद्धा कंत्राटदारामार्फत पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार १० उपनगरीय रुग्णालयांसाठी एकत्रित कंत्राट मुंबई महानगरपालिकेकडून काढण्यात आले आहे. त्यासाठी ३१ लाख रुपये अनामत रक्कम निश्चित करण्यात आली असून कंत्राट ठरावीक कंत्राटदाराला कसे मिळेल याची प्रशासनाकडून तजवीज करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे.
मुंबई महानगरपालिकेने १० उपनगरीय रुग्णालयांना अन्न पुरवठा करण्यासाठी खाजगी कंत्राटदारांकडून ३० ऑक्टोबरपर्यंत निविदा मागवल्या आहेत. त्यात उपनगरीय रुग्णालयांमध्ये दररोज सुमारे १ हजार ६०० रुग्णांना सकाळ आणि सायंकाळचे जेवण, नाश्ता, दुपारी बिस्किटे आणि चहा दिला जाणार आहे. जेवणात मधुमेह, उच्च रक्तदाब, मीठ नसलेले, मर्यादित मीठ आणि आरटी फीड असे विशेष आहार देखील समाविष्ट आहेत.
रुग्णांना वेळेवर व उत्तम दर्जाचे अन्न मिळावे यासाठी निविदा अटींमध्ये निकृष्ट किंवा असुरक्षित अन्नासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे. तसेच निविदेत पात्र ठरणाऱ्या कंत्राटदाराला सरकारी रुग्णालयांमध्ये किमान ७०० रुग्णांसाठी शिजवलेले अन्न पुरविण्याचा तीन वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. पुरवठादाराची तीन वर्षांची उलाढाल ११ कोटींपेक्षा जास्त असणे अपेक्षित असल्याची अट ठेवण्यात आली आहे. या निविदेसाठी ३१ लाख ५० हजार रुपयांची अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे. त्याचबरोबर नोंदणीकृत महिला संस्थासाठी ५० टक्के आरक्षण आहे. मात्र मुंबई महानगरपालिकेने १० रुग्णालयांची एकत्रित निविदा प्रक्रिया राबविताना ३१ लाख ५० हजार रुपयांच्या अनामत रकमेची अट घातली असून त्यामुळे महिला बचतगट, लहान कंत्राटदार या निविदेसाठी पात्र ठरू शकत नाहीत. कंत्राट ठरावीक कंपनीलाच मिळावे अशी तरतूद केल्याचे चर्चा रंगली आहे.
या रुग्णालयांसाठी कंत्राट
मुंबई महानगरपालिकेच्या मालाडमधील एस.के. पाटील रुग्णालय, एम. डब्ल्यू. देसाई रुग्णालय, बोरिवलीतील श्री हरिलाल भगवती रुग्णालय, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय, चेंबूरमधील माँ रुग्णालय, गोवंडीतील पंडित मदनमोहन मालविया शताब्दी रुग्णालय, मुलुंडमधील स्वातंत्र्यवीर सावरकर रुग्णालय, कांदिवलीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, घाटकोपरचे राजावाडी रुग्णालय आणि कस्तुरबा रुग्णालयासाठी मुंबई महानगरपालिकेने जेवणाचे कंत्राट काढण्यात आले आहे.
