मुंबई : निवृत्तीसोहळ्यानिमित्त प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले ‘देव आणि देवळांचा धर्म’ हे पुस्तक कस्तुरबा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना वाटल्याने वाद झाला. महिला कर्मचाऱ्यांनी पुस्तक वाटणारे कक्ष अधिकारी राजेंद्र कदम यांना जाब विचारून माफी मागण्यास भाग पाडले. यानंतरही कदम यांच्या अंगावर पुस्तक फेकून त्यांची चित्रफित व्हायरल करण्यात आली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात संबंधित महिला कर्मचाऱ्यांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र कदम (५८) हे कस्तुरबा रुग्णालयात कक्ष अधिकारी म्हणूून कार्यरत होते. ते ३० ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने त्यांनी २८ ऑगस्ट रोजी आपल्या सहकाऱ्यांना प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले ‘देव आणि देवळांचा धर्म’, तसेच दिनकरराव जवळकर यांचे ‘देशाचे दुश्मन’ या पुस्तकांचे वाटप केले. मात्र त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

महिलांनी विचारला जाब

रुग्णालयाच्या सहाय्यक अधिसेविकेने २९ ऑगस्ट रोजी कदम यांना कक्षात बोलावले. तेथे अन्य महिला परिचारिका आणि महिला कर्मचारी उपस्थित होत्या. या पुस्तकांमुळे आमच्या भावना दुखावल्या असे सांगत महिलांनी कदम यांना हे पुस्तक का वाटले ? म्हणून जाब विचारला. कदम यांनी माफी मागावी, अशी मागणी महिलांनी केली. माझा हेतू धर्माच्या भावना दुखावण्याचा नव्हत्या, तर परिवर्तनवादी विचार रुजावा असा होता, असे कदम यांनी यावेळी सांगितले. मात्र महिला आक्रमक झाल्या होत्या. कदम यांनी हात जोडून माफी मागितली. परंतु त्यांनतरही त्यांच्या अंगावर प्रबोधनकारांची पुस्तके फेकण्यात आली.

मला अचानक कक्षात बोलावले आणि महिलांनी जाब विचारला. ज्यांच्या सोबत अनेक वर्ष काम केले त्या महिला माझ्याविरोधात आक्रमक झाल्या होत्या. या महिलांनी माझ्याशी अर्वाच्च भाषेत बोलत माझा अपमान केला, असे कदम यांनी सांगितले.

चित्रफितही केली व्हायरल

या महिला कर्मचाऱ्यांनी ३० सप्टेंबर रोजी झालेला कदम यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्यावरही बहिष्कार टाकला. या महिलांनी २८ ऑगस्ट रोजी घडलेल्या प्रकाराची चित्रफित तयार केली होती. ती व्हायरल करण्यात आली. यामुळे कदम यांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली. परंतु रुग्णालयाने या महिलांवर ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे अखेर कदम यांनी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी संबंधित महिलांविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

‘होय. आम्ही जाब विचारला…’

या पुस्तकात आक्षेपार्ह आणि हिंदू धर्मियांबद्दल चुकीचे लिखाण आहे. त्यांनी पुस्तक वाटले, त्यामुळे आम्ही जाब विचारला, असे परिचारिका वैशाली कोलकगेरकर (श्रीजा सावंत) यांनी सांगितले. मात्र आम्ही त्यांचा अपमान केला नाही. चित्रफित आमच्या व्हॉटस ॲप समूहात पोस्ट केली होती. पण ती कशी व्हायरल झाली ते माहित नाही, असेही त्या म्हणाल्या.