मुंबई : कूपर रुग्णालय आणि हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालय येथे प्रशासकीय अनियमितता आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरून सुरू असलेल्या वादामुळे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांना २२ जुलै रोजी पदावनतीची नोटीस बजावली आहे. तसेच त्यांची त्वचा विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
ट्रॉमा केअर रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणार विलंब आणि पुनरावलोकनासाठी पाठविलेल्या नस्तीचा मुद्दा उपस्थित करत मेढेकर यांनी अनियमितता केल्याचा आरोप केल्याने मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उप आयुक्त यांनी याची चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच कूपर रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर मेढेकर यांची अधिष्ठाता पदावरून पदावनती केली.
तसेच पुढील आदेश येईपर्यंत कूपर रुग्णालय व हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयातील प्रशासकीय व आर्थिक अधिकार वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालयांच्या संचालक आणि नायर दंत रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांच्याकडे सोपविले आहेत. तर डॉ. सुधीर मेढेकर त्वचा रोग विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहतील, असे आदेश मुंबई महानगरपालिकेच्या उप आयुक्तांनी दिले आहेत.
कूपर रुग्णालयातील कामकाज सुरळीत करण्यासाठी, शिस्त लावण्यासाठी आणि रुग्णालयाच्या निविदा आणि कर्मचारी भरती प्रक्रियेशी संबंधित कथित अनियमितता दूर करण्यासाठी डॉ. सुधीर मेढेकर यांनी पावले उचलली होती.
कामामध्ये पारदर्शकता आणण्याच्या त्यांच्या या प्रयत्नांना रुग्णालय प्रशासनाकडून विरोध झाला. त्यातच कंत्राटी कर्मचाऱ्यांचे विलंबाने होणारे वेतन आणि निविदा नस्तींसदर्भातील प्रश्नांची त्यांनी दखल घेतली. त्यामुळे रुग्णालय प्रशासनातील अनेकांनी त्यांच्याविरोधात दंड थोपटले होते. त्यातच एक निविदा नस्ती मेढेकर यांनी पुनरावलोकनासाठी महानगरपालिकेच्या उपायुक्तांकडे पाठविण्याऐवजी एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठविली. त्यामुळे या प्रकरणाच्या तपासणीला विलंब झाला.
या प्रकरणात जाणूनबुजून गैरव्यवहार झाल्याचा आरोप प्रशासनाकडून करण्यात आल्याचे रुग्णालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले. रुग्णालयाच्या कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी डॉ. सुधीर मेढेकर यांनी घेतलेल्या कठाेर निर्णयामुळे महानगरपालिकेतील काही अधिकाऱ्यांना त्रास होत असल्यानेच त्यांना लक्ष्य करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिली.