शैलजा तिवले

करोना संसर्गानंतर सुमारे तीन आठवडय़ांनी सर्वाधिक प्रतिपिंडे तयार होतात, ५० दिवसांनंतर त्यांचे प्रमाण अत्यल्प होते, असे जे. जे. समूह रुग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांवर केलेल्या अभ्यासातून निदर्शनास आले. त्यामुळे रुग्णास एकाच वेळेस लस देऊन संरक्षण मिळण्याची शक्यता फार कमी असल्याने तिचे डोस काही टप्प्यांमध्ये देण्याची गरज भासू शकते, अशी या संशोधनातील निरीक्षणे आहेत.

नैसर्गिकरीत्या झालेल्या करोना संसर्गानंतर शरीरात तयार झालेली प्रतिपिंडे ५० दिवसांत झपाटय़ाने कमी होत असतील तर लस दिल्यानंतर तयार झालेल्या प्रतिपिंडांपासून किती काळ संरक्षण मिळेल, असा प्रश्नही या अभ्यासातून उपस्थित झाला आहे.

‘आयबीपी फाऊंडेशन’च्या माध्यमातून केलेला हा अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ कम्युनिटी मेडिसिन अ‍ॅण्ड पब्लिक हेल्थ’ या संशोधन पत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला आहे. जे जे समूहातील जीटी, जे जे आणि कामा या रुग्णालयांतील ८०१ आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रतिपिंडाच्या चाचण्या जूनमध्ये केल्या होत्या. त्यातील ६२ कर्मचाऱ्यांना करोनाचा संसर्ग असल्याचे ‘आरटीपीसीआर’ चाचण्यांमधून स्पष्ट झाले होते. या कर्मचाऱ्यांमधील प्रतिपिंडाच्या चाचण्यांवरून लशीच्या उपयुक्तता आणि परिणामकारकतेचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

संसर्ग झाल्यापासून २८ दिवसांपर्यंत ९० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली. त्यानंतर मात्र प्रतिपिंडांचे प्रमाण झपाटय़ाने कमी होत गेले. २९ ते ४२ दिवसांत ३८ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे आढळली. ४३ ते ४९ दिवसांमध्ये केवळ १४ टक्के कर्मचाऱ्यांमध्ये प्रतिपिंडे असल्याचे चाचणीत आढळले. ६२ पैकी २८ कर्मचाऱ्यांमध्ये ५० दिवसांपेक्षाही अधिक काळ प्रतिपिंडे आहेत का, याची पडताळणी केली गेली. या पडताळणीतून मात्र एकाही कर्मचाऱ्यात प्रतिपिंडे नसल्याचे आढळले. सुमारे तीन आठवडय़ांपर्यंत शरीरात प्रतिपिंडे तयार होतात. नंतर मात्र त्यांच्यात झपाटय़ाने घट होते. ५० दिवसांनंतर किंवा सात आठवडय़ांपेक्षा अधिक काळ शरीरात प्रतिपिंडे टिकत नाहीत, असे या अभ्यासातून निदर्शनास आले.

संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिपिंडासह टी लिम्फोसाइट (पांढऱ्या रक्तपेशींचा एक प्रकार) निर्माण होतात. या टी पेशींमुळेही आजारापासून संरक्षण मिळते. त्यामुळेच करोनाचा पुन्हा प्रादुर्भाव होण्याचे प्रमाण आणि त्याची तीव्रता तुलनेने फार कमी असू शकते. हे लक्षात घेऊन लशीची निर्मिती करताना प्रतिपिंडे आणि टी सेल यांचा एकत्रित अभ्यास केल्यास विषाणूविरोधातील रोगप्रतिकारक प्रतिक्रिया समजण्यास मदत होईल आणि लस देण्याचे टप्पे, प्रमाण ठरवता येईल, असा निष्कर्ष या अभ्यासातून काढण्यात आला आहे.

एका डोसने संरक्षणाची शक्यता कमी

पाश्चिमात्य देशांतील लोकांमध्ये संसर्गानंतर ७० ते ८० दिवस प्रतिपिंडे टिकत असल्याचे दिसून आले आहे. त्या तुलनेत भारतीयांची जनुके वेगळी आहेत. येथील लोकांमध्ये मात्र ही प्रतिपिंडे ५० दिवसांहून अधिक काळ टिकत नसल्याचे आढळले आहे. यावरून एकाच वेळी लस देऊन संरक्षण मिळण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे काही टप्प्यांमध्ये लशीचे डोस घेण्याची गरज भासू शकते, असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक पी. डी. हिंदुजा वैद्यकीय संशोधन विभागाचे डॉ. निशांत कुमार यांनी व्यक्त केले.

मे महिन्यात ६४ लाख करोनाबाधित : टाळेबंदी लागू असलेल्या मे महिन्यात ६४ लाख लोकांना करोनाची लागण झाली होती, असा निष्कर्ष भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेच्या (आयसीएमआर) पहिल्या देशव्यापी ‘सीरो’ सर्वेक्षणाच्या अहवालात काढण्यात आला.

राज्यात दहा लाखांहून अधिक रुग्ण

* मुंबई  : राज्यातील करोना रुग्णांची संख्या शुक्रवारी १० लाखांहून अधिक झाली. चोवीस तासांत २४,८८६ नवे रुग्ण आढळले आहे.

* आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. एकटय़ा पुणे जिल्ह्य़ात एका दिवसात ५२०८ रुग्ण आढळले.

* देशात गुरुवारी दिवसभरात ९६ हजार ५५१ नव्या रुग्णांची भर पडली, तर १२०९ रुग्णांचा मृत्यू झाला.