मुंबई : केंद्राच्या निर्देशानुसार, राज्यभरात बुधवारपासून  १२  ते १४ वयोगटातील बालकांसाठी करोना प्रतिबंधात्मक लसीकरण  सूरू होणार आहे. राज्यात या वयोगटातील सुमारे ६५ लाख बालके या लसीकरणासाठी पात्र असून या बालकांना कोर्बेव्हॅक्स ही लस देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

१५ ते १७ वयोगटातील बालकांच्या लसीकरणानंतर आता केंद्राने १२  ते १४ वयोगटातील किशोरवयीन बालकांच्या लसीकरणालाही  मंजुरी दिली आहे. राज्यभरात बुधवारपासून या बालकांचे लसीकरण  सुरू होणार आहे. केंद्राच्या सूचनेनुसार २००८ ते २०१० या काळात जन्माला आलेल्या बालकांना ही लस घेता येईल. राज्यातील सुमारे ६४ लाख ९५ हजार बालके या लसीकरणासाठी  पात्र आहेत. हैद्राबाद येथील बायोलॉजिकल  इ. लिमिटेड या कंपनीची कोर्बेव्हॅक्स  ही लस या बालकांना देण्यात येणार आहे.  देशभरात लसीकरणासाठी  सुमारे ७ कोटी ११ लाख बालके पात्र आहेत. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये कंपनीने लसीकरणासाठी  सुमारे पाच कोटी मात्रा केंद्रीय आरोग्य विभागाला दिलेल्या आहेत.

करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झाल्या आहेत. त्यामुळे १५ वर्षांखालील बालकांच्या लसीकरणाची अनेक दिवसांपासून पालकांना प्रतीक्षा होती. मुंबईत बुधवारपासून १२  ते १४ वयोगटातील लसीकरण  प्रायोगिक तत्त्वावर १२ केंद्रावर आयोजित केले आहे. या केंद्रावरील अडचणी, प्रतिसाद लक्षात घेऊन पालिकेच्या अन्य केंद्रावरही याचे लसीकरण सुरू करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. पालिकेला  या लसीकरणासाठी  कोर्बेव्हॅक्स  लशीच्या  सुमारे १ लाख २२ हजार  मात्रा प्राप्त झाल्या आहेत. राज्यात १५ ते १८ वयोगटाचे पहिल्या मात्रेचे  लसीकरण सुमारे ६० टक्के झाले आहे. दोन्ही मात्रा घेतलेल्या या वयोगटातील बालकांचे प्रमाण सुमारे ५८ टक्के आहे. बुधवारपासून ठाणे जिल्ह्यातही १२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरण मोहीमेस सुरुवात झाली आहे. 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona vaccination children ages today vaccine vaccination ysh
First published on: 16-03-2022 at 01:06 IST