उपाहारगृहे, सभा-समारंभ, विवाह सोहळ्यांमधील उपस्थितीवर निर्बंध

मुंबई : करोनाची वाढती रुग्णसंख्या आणि ओमायक्रॉनचा वाढता प्रादुर्भाव यामुळे गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी राज्यात काही नवे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यानुसार रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांनी सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे.

विवाहसोहळे, धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रमांमध्ये उपस्थितीवर नियंत्रण आणण्यात आले आहे. उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामाशाळांमध्ये ५० टक्के उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. नाताळ, नववर्ष समारंभ साजरे करताना गर्दी होऊ नये यासाठीच ही खबरदारी घेण्यात आली आहे. या निर्बंधांचा उपाहारगृहे आणि मनोरंजन क्षेत्रांना मोठा फटका बसणार आहे. 

नवे निर्बंध शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत.

निर्बंधांची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी विधानसभेत केली. गेल्या दोन महिन्यांनंतर प्रथमच गेल्या काही दिवसांपासून दररोज हजाराहून अधिक करोना रुग्ण आढळत असल्याने हे निर्बंध लागू करावे लागल्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारने केले आहे. एखाद्या जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढल्यास निर्बंध अधिक कठोर करण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनास देण्यात आले आहेत.

काही राज्यांनी रात्रीची संचारबंदी लागू केली असली तरी राज्यात मात्र रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. यानुसार या कालावधीत पाच किंवा त्यापेक्षा अधिक लोकांना सार्वजनिक ठिकाणी एकत्र बाहेर पडता येणार नाही वा एकत्र जमता येणार नाही.

जगात चौथी लाट, देशात गंभीर इशारा

नवी दिल्ली : जग करोना साथीच्या चौथ्या लाटेचा सामना करीत असल्याचे निदर्शनास आणत केंद्र सरकारने शुक्रवारी गंभीर इशारा दिला. नाताळच्या पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी आणि अनावश्यक प्रवास टाळावा, करोना प्रतिबंधक नियम पाळावेत, त्याचबरोबर त्वरित लसीकरण करावे, असे आवाहन केंद्राने केले. गेल्या २४ तासांत देशात करोनाच्या नव्या उत्परिवर्तित विषाणूचे ३५८ रुग्ण आढळले.

रेल्वे, कार्यालयांवर नियंत्रण नाही

रेल्वे प्रवास, कार्यालयीन उपस्थितीवर अजून तरी कोणतेही निर्बंध लागू करण्यात आलेले नाहीत. रुग्णसंख्या वाढीचा दर किंवा अन्य घटक लक्षात घेऊन नवीन वर्षाच्या सुरुवातीला पुन्हा आढावा घेतला जाईल. त्यानंतर गरज भासल्यास निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील.

राज्यात १४१० नवे रुग्ण

राज्यात लागोपाठ तिसऱ्या दिवशी करोना रुग्णसंख्येत वाढ झाली असून, दिवसभरात १,४१० नवे रुग्ण आढळले, तर ओमायक्रॉनचे २० नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सावध झाली आहे. राज्यातील ओमायक्रॉनच्या  रुग्णांची संख्या १०८ झाली आहे. ओमायक्रॉनच्या २० रुग्णांपैकी पुण्यात सहा, मुंबईत ११, सातारा येथे दोन तर अहमदनगरमध्ये एक रुग्ण आढळला. यापैकी एक जण १८ वर्षांखालील असून सहा जण ६० वर्षांहून अधिक वयाचे आहेत. त्यापैकी १२ रुग्णांचे लसीकरण झाले आहे.

उपस्थितीवर संख्याबंधन

लग्नकार्य   विवाहसोहळ्यांना कोणत्याही प्रकाराच्या बंदिस्त सभागृहांमध्ये एका वेळी १०० पेक्षा अधिक लोकांना उपस्थित राहता येणार नाही. मोकळ्या मैदानात २५० लोके किंवा क्षमतेच्या २५ टक्के उपस्थितीची अट.

जाहीर कार्यक्रम   सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमांकरिता बंदिस्त सभागृहात १००, तर खुल्या वा मोकळ्या मैदानात २५० लोकांनाच उपस्थित राहता येईल. अन्य समारंभाला बंदिस्त सभागृहात क्षमतेच्या ५० टक्के, तर खुल्या मैदानात क्षमतेच्या २५ टक्केच उपस्थितीला  परवानगी. क्रीडा स्पर्धांसाठी क्षमतेच्या २५ टक्केच प्रेक्षकांना परवानगी कायम.

उपाहारगृहे, चित्रपटगृहे   उपाहारगृहे, चित्रपट व नाट्यगृहे, व्यायामशाळा यामध्ये सध्या लागू असलेली ५० टक्के उपस्थितीची अट यापुढेही कायम राहील. उपाहारगृहमालकांना एकूण क्षमता किती याची माहिती दर्शनी भागात ठळकपणे प्रदर्शित करावी लागेल.