मुंबईमधील लिलावती रुग्णालयात करोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून त्यात यश मिळालं असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

राजेश टोपे यांनी सांगितलं की, “लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे. पण ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे”.

आणखी वाचा- मुंबईत ८३ टक्के रुग्णांमध्ये करोनाची लक्षणं नाहीत, राजेश टोपे यांची माहिती

दरम्यान मालेगावमधील परिस्थितीवर बोलताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, “दाटीवाटीची जागा असल्याने अनेक ठिकाणी लोकाना घरात क्वारंटाइन होणं शक्य नाही. पण शक्य आहे तिथे संस्थात्मक क्वारंटाइन केलं जाव अशी सूचना जिल्हाधिऱ्यांना दिली आहे”. बैठकीत मालेगावमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून त्या पार्श्वभुमीवर चर्चा करण्यात आली.

आणखी वाचा- …अन्यथा खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करणार, राजेश टोपे यांचा इशारा

“२०० खाटांचं रुग्णालय करोनासाठी वापरलं जाणार आहे. तसा निर्णय घेण्यात आला आहे. डॉक्टर, नर्स जे पोस्टिंग केल्यानंतरही गेलेले नाहीत त्यांना २४ तास दिले आहेत. जर ते जॉईन झाले नाहीत तर निलंबन करण्याचा आदेश देण्यात आला आहे. त्यांना लागणाऱ्या सर्व सुविधा दिल्या जाणार आहेत. जायचंच नाही हा दृष्टीकोन योग्य नाही,” असं राजेश टोपे यांनी यावेळी सांगितलं.

आणखी वाचा- करोनाचा लढा देण्यासाठी मुंबईप्रमाणेच मालेगावातही टास्क फोर्स- राजेश टोपे

“अज्ञानीपणामुळेही अनेकदा मृत्यू होत आहेत. त्यांना समजावून सांगणं गरजेचं आहे. जे १२ मृत्यू झाले आहेत त्यांचा दाखल झाल्यानंतर २४ तासात मृत्यू झाला आहे. खासगी रुग्णालयांना सरकार पीपीई किट देणार आहे. खासगी रुग्णालयांनी सहकार्य करण्यास नकार दिला तर कठोर कारवाई करावी लागेल. मालेगाव मिशन आपल्याला यशस्वी करायचं आहे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत,” असं राजेश टोपे म्हणाले आहेत. “मालेगावात काही ठराविक कुटुंबात फैलाव झाला आहे. सगळीकडे झालं आहे असं नाही. नाशिक शहर, ग्रामीण, येवला देखील नियंत्रणात आहे,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

आणखी वाचा- ‘लोक’जागर : प्लाझ्मा थेरपी म्हणजे काय?

काय आहे कॉनव्हॅलसंट प्लाझ्मा थेरपी
कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण १२ दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येते. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले.


करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या (राज्यवार) 

राज्यमृत्यू
महाराष्ट्र400
गुजरात181
मध्य प्रदेश120
दिल्ली54
राजस्थान52
आंध्र प्रदेश31
उत्तर प्रदेश34
तेलंगणा26
तमिलनाडू25
कर्नाटक20
पश्चिम बंगाल22
पंजाब19
जम्मू कश्मीर08
हरयाणा05
केरल03
झारखंड03
बिहार02
हिमाचल प्रदेश02
आसाम01
मेघालय01
ओडिशा01
पुद्दुचेरी01
एकूण 1011

(स्रोत – https://www.mygov.in/covid-19)