मुंबई : राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातील भारतीय ज्ञान प्रणालीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठात शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे. मुंबई विद्यापीठातील हिंदू अध्यासन केंद्राच्या पुढाकारातून मंदिर व्यवस्थापन विषयात ६ महिन्याचा प्रमाणपत्र आणि एक वर्षाचा पदविका अभ्यासक्रम राबविला जाणार आहे. या अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया जून २०२४ पासून सुरू होत आहे.
मुंबई विद्यापीठाचे हिंदू अध्यासन केंद्र आणि टेम्पल कनेक्ट या संस्थेत नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती होण्यासाठी या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. दरम्यान, या अभ्यासक्रमांना मिळणारा प्रतिसाद पाहून आगामी काळात प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमांची व्याप्ती वाढवून ‘एमबीए इन टेम्पल मॅनेजमेंट’ असाही अभ्यासक्रम राबविण्याचा विद्यापीठाचा मानस असल्याचे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले.
प्रमाणपत्र व पदविका अभ्यासक्रमांची वैशिष्ट्ये
‘मंदिर व्यवस्थापन’ या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून भारतीय ज्ञान परंपरा, व्यवस्थापन शास्त्राची महत्त्वाची सूत्रे व तत्वे, स्थापत्य, गर्दीचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वित्त व्यवहार, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आणि पर्यावरण व परिसरपूरक अशा अनुषंगिक विषयांवर प्रकाश टाकला जाणार आहे. विशेष म्हणजे या प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमात ३ महिन्यांचे कार्यांतर्गत प्रशिक्षण उपलब्ध करून दिले जाणार आहे. ज्यामध्ये मुंबईसह महाराष्ट्र आणि देशातील विविध मंदिरांमध्ये प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण उपलब्ध होऊ शकेल.