करोनाच्या दुसऱ्या लाटेचा फटका बसल्यानंतर राज्यात लावण्यात आलेल्या निर्बंधांमधून सूट देण्यात आली आहे. मात्र सूट देण्यात आल्यानंतर मुंबईच्या रस्त्यांवर होणारी गर्दी राज्य सरकारसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी या गर्दीबाबत चिंता व्यक्त करत पुन्हा कडक निर्बंधांचा इशारादेखील दिला आहे. दरम्यान त्यानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीदेखील यावर भाष्य केलं आहे.

“मुख्यमंत्र्यांनी कालच इशारा दिलेला आहे. त्याचं लोकांनी पालन केलं पाहिजे. कारण कोणताही निर्णय, कोणतंही संकट एकटं राज्य, महापालिका किंवा केंद्रावर सोडून चालत नाही, त्यासाठी लोकांचा साथ हवी आणि त्यांनी ती दिलीच पाहिजे. जर लोक साथ देत नसतील तर वेगळा विचार करावा लागेल असं मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलं आहे,” असं किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

अशीच गर्दी राहिली तर पुन्हा कठोर निर्बंध

“राज्य सरकार हे सगळं पाहत आहे. राजेश टोपे, मुख्यमंत्री सगळं अनुभवत असून निश्चित याच्यावर तोडगा काढला जाईल,” असं किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी काय म्हटलं आहे –
करोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि राज्यात लागू करण्यात आलेले निर्बंध काहीप्रमाणात शिथिल करण्यात आले असले तरी ही बंधने अजून उठवलेली नाहीत. करोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. पण मुंबईतील आजची गर्दी चिंताजनक आहे. अशीच गर्दी राहिली तर पुन्हा कडक निर्बंध लावावे लागतील असा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईकरांना दिला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईतील सध्याची नियमावली –

  • अत्यावश्यक दुकानं सकाळी ७ ते दुपारी २ वाजेपर्यंत सुरु राहतील
  • आवश्यकतेनुसार दुकाने सोमवार ते शुक्रवारी सकाळी ७ ते दुपारी २ पर्यंत सम-विषम पद्धतीने सुरु राहतील. शनिवार रविवार दुकानं बंद असतील.
  • ई कॉमर्स अंतर्गत अत्यावश्यक वस्तूंबरोबर आवश्यकतेतर वस्तूंचे वितरण करण्यास परवानगी असेल
  • व्यापारी आस्थापनांना सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर आणि इतर उपाययोजना अनिवार्य राहतील
  • ‘ब्रेक द चेन’बाबतची नियमावली नवा आदेश येईपर्यंत लागू असेल