मुंबई महानगर पालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) समन्स बजावले आहे. तसेच, सोमवार १६ जानेवारी रोजी त्यांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. प्राप्त माहितीनुसार करोना काळात वैद्यकीय उपकरणे खरेदी प्रकरणात हे समन्स बजावले गेले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया देताना सूचक इशारा दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्या म्हणाले, “इक्बालसिंह चहल यांनी इतके दिवस संजय राऊत आणि त्यांचे घोटाळेबाज पार्टनरला वाचवण्यासाठी का धडपड केली.? १०० कोटींचा घोटाळा, कोविड सेंटर घोटाळा, हजारो कोविड रुग्णाच्या जीवाशी खेळण्याचं पाप संजय राऊत यांच्या पार्टनरने केलं आणि त्यांना वाचवण्यासाठी मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल एवढी धडपड करतात. मला मान्य नाही आणि म्हणून मी ईडी, आयकर विभाग, कंपनी मंत्रालय, मुंबई पोलीस, कॅग अशा पाचही संस्थाना आग्रही केला आहे. या पाचही संस्था या घोटाळ्याची चौकशी करत आहेत.” एबीपी माझाशी ते बोलत होते.

याशिवाय, “मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने हे टेंडर पास केलं. त्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पण जाब द्यावाच लागणार, ते कुणासाठी नोकरी करत होते मातोश्रीसाठी की मुंबईच्या जनतेसाठी? माझ्याकडे सगळ्या फाईल्स आणि कागदपत्रं आहेत. कुठली कंपनी अस्तित्वात नाही, कुठलं टेंडर निघालं नाही. फक्त मातोश्रीवरून फोन येतो म्हणून संजय राऊतांच्या बेनामी कंपनीच्या पार्टनरला १०० कोटींचं कंत्राट. इक्बालसिंह चहल असो किंवा आणखी अधिकारी असो त्यांना या प्रश्नांचे उत्तर द्यावच लागणार आहे. ईडी असो ईओडब्ल्यूने चौकशी सुरू केली आहे. आयकर विभागानेही चौकशी सुरू केली आहे. कंपनी मंत्रालयाने या कंपनीच्या विरोधात आणखी एक गुन्हा दाखल केला आहे. कोविडची कमाई इथेच चुकती करावी लागणार.” असंही किरीट सोमय्या यांनी यावेळी म्हटलं.

हेही वाचा – मोठी बातमी! मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ‘ईडी’चे समन्स

करोनाकाळात मुंबई पालिकेने उभारलेल्या करोना केंद्रांत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. याबाबत त्यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. तसेच याची कॅगद्वारे चौकशी होणार, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली होती.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Covid earnings will have to be paid here kirit somayyas warning after ed summons iqbalsingh chahal msr
First published on: 13-01-2023 at 22:23 IST