मुंबई : दिवाळीच्या पहिल्या तीन दिवसांत मुंबईत विविध ठिकाणी आगीच्या ८५ दुर्घटना घडल्या असून त्यापैकी ३७ ठिकाणी फटाक्यामुळे आग लागली होती. लक्ष्मीपूजनानिमित्त सोमवारी मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली असून या दिवशी फटाक्यांमुळे सर्वाधिक म्हणजे २८ ठिकाणी आग लागली. या दुर्घटनांमध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.

हेही वाचा >>> विमानतळावरून भुयारीमार्गे दहिसर गाठता येणार ; टर्मिनल २ – पश्चिम द्रुतगती मार्गादरम्यान भुयारी मार्ग उभारणार

दरवर्षी दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे मोठ्या प्रमाणावर आग लागण्याच्या दुर्घटना घडतात. त्यामुळे अग्निशमन दलाला या काळात सतर्क राहावे लागते. गेल्या शनिवारपासून दिवाळी सुरू झाली. सोमवारी लक्ष्मीपूजन पार पडले. बुधवारी भाऊबीज आणि पाडवा आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईत मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली असून या दिवशी मोठ्या प्रमाणावर आगीच्या दुर्घटना घडल्याची माहिती अग्निशमन दलातील अधिकाऱ्यांनी दिली.

दिवाळी सुरू झाल्यापासून तीन दिवसांमध्ये शहर आणि उपनगरात एकूण ८५ ठिकाणी आगीच्या दुर्घटनांची अग्निशमन दलाकडे नोद झाली. त्यापैकी ३७ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागली होती. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकूण ४१ ठिकाणी आग लागली होती. त्यापैकी २८ ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागल्याचे अग्निशमन दल प्रमुख हेमंत परब यांनी सांगितले. मध्य मुंबईतील लालबाग, परळ, दादर, तसेच वांद्रे – जोगेश्वरी पश्चिम परिसरात सर्वाधिक आगीच्या दुर्घटना घडल्या.

हेही वाचा >>> आरेतील ‘तो’ बिबट्या लवकरच जेरबंद होणार ; स्थानिकांच्या मागणीनुसार पिंजरे, सीसी टीव्ही कॅमेरे बसविणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गेल्या दोन दिवसांत फटाक्यांमुळे आग लागण्याचे प्रमाण अधिक आहे. फटाक्यांमुळे आग लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बहुतांश उडणाऱ्या फटाक्यांमुळे आग लागण्याच्या दुर्घटना घडतात. बाण, चिडी, आकाशात फुटणारे बॉम्ब यामुळे आग लागत असल्याचे आढळून आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. इमारतींच्या संकुलात, जिन्यात फटाके वाजवताना दुर्घटना घडतात, असेही ते म्हणाले. फटाके फोडण्यासाठी अगरबत्ती व फुलबाजाचा वापर करावा. इमारतीमध्ये वा जिन्यावर फटाके फोडू नयेत, फटाक्यांची वात पेटविताना थेट आगकाडी अथवा लायटरचा वापर करू नये, झाडे, विद्युत तार किंवा उंच इमारतीजवळ हवेत उडणारे फटाके फोडू नयेत, खिडक्यांच्या पडद्याजवळ पणत्या, दिवे लावू नयेत, विजेच्या तारा, गॅस पाइपलाइन किंवा वाहनतळांच्या ठिकाणी फटाके फोडू नयेत, असे आवाहन अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे.