मुंबई : आरे वसाहतीतील काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्याला पुन्हा तडे गेले आहेत. अवघ्या वर्षभरापूर्वीच हा रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता. मात्र, या रस्त्याला जानेवारीत तडे गेल्यानंतर दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु आता पुन्हा एकदा रस्त्याच्या त्याच भागात तडे पडल्याचे निदर्शनास आले आहे.
माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खड्डेमुक्त मुंबईसाठी रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. त्यानुसार महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यास सुरुवात केली. याअंतर्गत गेल्या वर्षी आरेमधील रस्त्यांचेही काँक्रीटीकरण करण्यात आले होते. यातील आरे वसाहतीतील युनिट क्रमांक ५ पासून युनिट क्रमांक ६ च्या दिशेने जाणाऱ्या काँक्रीटच्या रस्त्याला पुन्हा तडे पडले आहेत. याआधी जानेवारी महिन्याच्या सुरुवातीलाही या रस्त्याचे काम करण्यात आले होते. दरम्यान, दोन वेळा काँक्रीटीकरण केलेल्या रस्त्यावर तडे पडतात किंवा काही भागात पुन्हा खोदकाम केले जाते. यामुळे नागरिकांमध्ये आधीच नाराजी पसरली आहे. आता पुन्हा या नवीन बांधकाम केलेल्या रस्त्यावर तडे पडल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर काँक्रीटीकरण केल्यानंतर रस्त्यावर तडे कसे जातात, असा सवाल रहिवाशांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
याआधी आरे दूध वसाहतीतील काँक्रीटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यांवरही पुन्हा खोदकाम करण्यात आले होते. रस्त्यांच्या मधोमध उभ्या रेषेत खोदकाम केल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. परिसरातील सततच्या रस्ते कामामुळे सकाळी आणि सायंकाळी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, मुंबईकरांना रुंद, खड्डेमुक्त आणि दर्जेदार रस्त्यांच्या माध्यमातून वेगवान प्रवास करता यावा यासाठी पालिका प्रशासनाने मुंबईतील संपूर्ण रस्त्यांचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेतला. काही महिन्यांपूर्वी आरेमधील रस्त्यांचे काँक्रीटीकरण झाल्यामुळे संबंधित भागातील रहिवाशांना दिलासा मिळाला होता. मात्र, पुन्हा काँक्रीटीकरण झालेल्या रस्त्यांवर खोदकाम करण्यात आल्यामुळे रहिवासी संतप्त झाले आहेत. दरम्यान, यासंदर्भात मुंबई महापालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.