मुंबई – कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये प्रवाशाला मारहाण करून त्याच्या पत्नीशी असभ्य व्यवहार केल्याप्रकरणी रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानाविरोधात सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार सनी भोसले हे ६ मे रोजी पत्नी आणि ३ वर्षाचा मुलीसह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे आले होते. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे जायचे होते. त्यासाठी ते कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये चढले. मात्र तेथे रेल्वे सुरक्षा बलाचे जवान युवराज माळी यांनी हटकले. तो डब्बा ठाण्यातील प्रवाशांसाठी आरक्षित असल्याचे सांगण्यात आले. त्यावरून वाद झाला. यावेळी माळी यांनी सनी भोसले यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या पत्नी आणि लहान मुलीला धक्काबुक्की करत शिविगाळ केली. त्या मारहाणीत भोसले यांच्या पत्नीच्या हातातील बांगडी फुटून रक्त आले. तसेच सर्वासमक्ष धक्काबुक्की करून विनयभंग केल्याचा आरोप भोसले यांच्या पत्नीने केला. याप्रकरणी भोसले यांनी राजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. हा गुन्हा सीएसएमटी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. आरपीएफ जवान माळी यांच्याविरोधात विविध कलमांअतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोकणकन्या एक्स्प्रेसमध्ये दोन डबे असतात. एक सीएसएमटीमधील प्रवाशांसाठी तर दुसरा ठाण्याती प्रवाशांसाठी आरक्षित असतो. तक्रारदार कुटुंब ठाण्यातील डब्यात चढले होते. त्यांना मज्जाव करत असताना वाद झाला, असे सीएसटी रेल्वे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे यांनी सांगितले. शासकीय कर्तव्य बजावत असताना हा प्रकार घडल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहेत. आम्ही याप्रकरणी तक्रारदार तसेच आरोपी पोलिसाला जबाब देण्यासाठी बोलावले आहे. पुढील तपासात नेमके काय घडले ते स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले.