मुंबई : दहिसरच्या जनकल्याण इमारतीमधील आग दुर्घटनेप्रकरणी दहिसर पोलिसांनी विकासक, कंत्राटदार आणि प्रकल्प पर्यवेक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या भीषण आगीत दोन महिलांचा मृत्यू झाला होता.
दहिसर पूर्व येथील एस. व्ही. रोड येथील शांती नगरमध्ये २३ मजली जनकल्याण इमारत आहे. ती झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत बाधण्यात आली आहे. ७ सप्टेंबर रोजी दुपारी २.३० च्या सुमारास इमारतीला आग लागली. या आगीत ५४ जण जखमी झाले होते. २१ जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यापैकी मधु पटेल (५३) आणि भाची प्रिया उगरेजिया (२४) या दोघींचा मृत्यू झाला होता.
इमारतीत अग्निसुरक्षा यंत्रणेचा अभाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या इमारतीची देखभाल व सुरक्षिततेची जबाबदारी एन. रोज डेव्हलपर्स या कंपनीचे संचालक, तसेच कंत्राटदार, पर्यवेक्षक व इतर संबंधित व्यक्ती यांच्यावर होती. परंतु आगीच्या वेळी आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात हलगर्जीपणा आढळून आला. इमारतीतील अग्निसुरक्षा प्रणाली (फायर अलार्म, पाण्याची यंत्रणा इ.) कार्यरत नव्हती. या प्रणालीसाठी आवश्यक स्वतंत्र वीजपुरवठाही उपलब्ध करून देण्यात आला नव्हता. यामुळे आग लागल्यावर यंत्रणा सुरू झाली नाही आणि अनेक रहिवाशांचे प्राण धोक्यात आले.
गुन्हा दाखल
दहिसर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०६, १२५ (अ) व १२५ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असे दहिसर पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले.
नेमकी घटना कशी घडली ?
याबाबत इमारतीमधील रहिवाशी महेश पटेल यांनी तक्रार दिली आहे. ते इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर आई, पत्नी, मुलगी, काकू मधु पटेल (५३) आणि भाची प्रिया उगरेजिया (२४) यांच्यासह रहात होते. दुपारी २.३० च्या सुमारास अचानक डक्टमधून धूर पसरू लागला. लोक किंचाळत पळू लागले. पटेल यानी कुटुंबासह खाली जाण्यास सुरुवात केली. त्यांच्या काकू मधू पटले आणि भाची प्रिया उगजेरिया दुसऱ्या मजल्यावर घसरून पडल्याने त्या अडकल्या. नंतर रहिवाशांनी त्यांना बाहेर काढले. गंभीर दुखापत झाल्याने मधु यांना शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रियाला प्रथम रोहित नर्सिंग होम आणि नंतर मालाडच्या तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान दोघींचा मृत्यू झाला.