संबंधित अधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

मुंबई : गुन्हेगारी घटना आणि टोळीयुद्धामुळे हैराण झालेले भांडुपवासीय कायदा व सुव्यवस्थेसाठी पोलिसांकडे डोळे लावून बसले असताना भांडुप पोलीस ठाण्यात गुन्हेगारी पाश्र्वभूमीव असलेल्या एका तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतच्या चित्रफिती, छायाचित्रे समाजमाध्यमावरून प्रसारीत झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्याची गंभीर दखल घेत पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या खातेअंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत.

भांडुपमधील संघटित गुन्हेगारी टोळ्यांवर आणि त्यांच्यातील टोळीयुद्धावर, गुन्ह्यंवर नियंत्रण मिळवण्यात येथील पोलीस सातत्याने अपयशी ठरत आहेत. त्यातच गुन्हेगारी पाश्र्वभूमी असलेल्या तरुणांसोबतशी अशी सलगी पुढे आल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोलिसांबाबत नाराजी आहे. वाढदिवसाची छायाचित्रे सर्वदूर पसरल्यानंतर भांडुप पोलिसांवर टीका सुरू झाली. प्रत्यक्षात या आधीही असे वाढदिवस पोलीस ठाण्याच्या मुख्य इमारतीसह बीट चौक्यांमध्ये साजरे झाल्याची माहिती मिळते. गेल्या आठवडय़ात सोनापूर येथे वास्तव्यास असलेल्या अयान खान या तरुणाचा वाढदिवस पोलीस ठाण्याच्या चौथ्या मजल्यावरील खोलीत साजरा झाला. पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना केक भरवतानाची छायाचित्रे, चित्रण व्हायरल झाले होते.

काही दिवसांपूर्वी येथील टेंभीपाडा परिसरात सचिन कुलकर्णी उर्फ चिंग्या या तरुणाचा वाढदिवसाच्या पार्टीत भांडुप पोलीस ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी बेधुंद नाचताना पाहिल्याचा दावा स्थानिक रहिवासी करतात. या परिसरात बीट चौकी आहे. त्या शेजारील रस्त्यावर दुतर्फा वाहने पार्क होतात. त्या वाहनांकडून सचिन मासिक भाडे वसूल करतो आणि त्यातील निम्मी रक्कम चौकीला देतो. चौकीतल्या अधिकाऱ्यांमुळेच हे काम त्याला मिळाले, असा आरोप स्थानिक रहिवासी करतात.

अयान प्रकरण पुढे आल्यानंतर भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रमेश खाडे यांनी संबंधित अधिकाऱ्यांविरोधात खातेनिहाय चौकशीची प्रक्रिया सुरू केली. सोमवारी बैठक घेत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. पोलीस ठाणे, बीट चौक्यांमध्ये अशा प्रकारे पार पडलेल्या वाढदिवसांची माहिती घेऊन कारवाई केली जाईल, असे खाडे यांनी ‘लोकसत्ता‘ला सांगितले.

पोलीस ठाणे की ‘पार्टी’ स्थळ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अयानआधी पोलीस ठाणे, बीट चौक्यांमध्ये गुन्हेगारी पाश्र्वभूमीच्या बऱ्याच तरुणांचे वाढदिवस पार पडले आहेत. त्यापैकी मिलिंद नगर, तुलशेत पाडा येथील तरुणांच्या वाढदिवसाची छायाचित्रे ‘लोकसत्ता’कडे आहेत. हे तरुण भांडुपमधल्या झोपडीदादा, मुकादम, कंत्राटदारांकडून खंडणी उकळतात, अशी माहिती मिळते.