मुंबई : धुळे येथील शासकीय विश्रामगृह ‘गुलमोहर’मधील खोली क्रमांक १०२ मध्ये सापडलेली १ कोटी ८४ लाख रुपयांच्या रोख रक्कमप्रकरणी विधिमंडळाचे निलंबित कक्ष अधिकारी किशोर पाटील यांच्या विरोधात याप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी दिली. तसेच पाटील यांच्या नियुक्तीचा आदेश निघाला नसतानाही ते दौऱ्यावर गेल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विकासकामांची पाहणी करण्यासाठी विधानसभेच्या अंदाज समितीचे ११ आमदार सदस्य गेले होते. त्यांची राहण्याची व्यवस्था धुळे शासकीय विश्रामगृहावर करण्यात आली होती. याच विश्रामगृहातील खोली क्रमांक १०२ ही अंदाज समितीचे अध्यक्ष आमदार अर्जुन खोतकर यांचे स्वीय सहाय्यक किशोर पाटील यांच्या नावावर चार दिवसाअगोदर आरक्षित करण्यात आली होती. या खोलीत कोट्यवधी रुपये असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला.
आमदारांना वाटण्यासाठी ठेकेदारांकडून ही रोख रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला होता. गोटे यांच्या आंदोलनानंतर पोलिसांनी खोली उघडून पंचनामा केला होता. या पंचनाम्यात १ कोटी ८४ लाख रुपये रोख रक्कम आढळून आली. यातील काही रक्कम आमदारांपर्यंत पोहचवण्यात आली होती. प्रत्यक्षात पाच कोटींची रक्कम गोळा करण्यात आल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.
किशोर पाटील कोण आहेत?
विधिमंडळ सचिवालयात कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत असलेले किशोर पाटील हे गेली अनेक वर्षे अंदाज समितीच्या अध्यक्षांचे सचिव म्हणून काम करतात. समितीचे विद्यामान अध्यक्ष अर्जुन खोतकर हे राज्यमंत्री असताना त्यांचे सचिव म्हणून काम केले होते. अंदाज समितीचा दौरा असला की आधी तीन ते चार दिवस संबंधित जिल्ह्यात जाऊन अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत असत. आमदारांच्या दौऱ्यापूर्वी पाटील आधी का पोहचत असत हे धुळे दौऱ्यावरून स्पष्ट झाले. त्यांच्या कक्षात १ कोटी ८४ लाखांची रोख रक्कम सापडली आहे. यामुळेच बहुधा अंदाज समितीच्या अध्यक्षांना पाटील यांची ‘सेवा’ नेहमीच हवीहवीशी वाटत असे. पाटील हे कार्यालयात कमी आणि बाहेरच जास्त फिरत असत, अशी माहितीही मिळते. वादग्रस्त प्रतिमा असलेल्या पाटील यांनी कोट्यवधींची माया जमा केल्याचा आरोप केला जातो.
लवकरच सर्वपक्षीय बैठक
विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी किशोर पाटील यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. पाटील यांना अंदाज समितीचे अध्यक्ष खोतकर यांचे स्वीय सहायक म्हणून नेमणूक करण्यास अध्यक्षांनी संमती दिलेली नव्हती. तरीही ते खोतकर यांचे स्वीय सहायक म्हणून काम करीत होते. हा प्रकार गंभीर असून पाटील खोतकर यांच्या बरोबर का, कशासाठी गेले होते याची चौकशी केली जाणार आहे. या रोकड प्रकरणानंतर सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाणार असल्याचे अॅड. नार्वेकर यांनी सांगितले.