मुंबई : गेल्या काही वर्षांत मुंबई, नवी मुंबईतील विविध भागातील कांदळवनांवर गंडातर आले आहे. कचरा फेकणे, अतिक्रमणे, विकासकामे यांमुळे पर्यावरणाच्यादृष्टीने संवेदनशील परिसंस्थेचे अस्तित्व धोक्यात आले आहे. प्लास्टिक, वैद्यकीय कचरा, घरगुती कचरा यांनी कांदळवनांवर संक्रांत आसली असून करावे जेट्टी परिसरातील कांदळवन क्षेत्रात रविवारी झालेल्या स्वच्छता मोहिमे दरम्यान मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय कचरा आढळला.
पर्यावरणप्रेमी स्वयंसेवी संथ्या आणि स्थानिक नागरिक दर रविवारी करावे जेट्टी परिसरात स्वच्छता मोहीम राबवतात. दरम्यान, वापरलेल्या सीरिंज, रक्ताचे नमुने, पट्य्या आणि इतर जैववैद्यकीय वस्तू आदी या स्वच्छता मोहिमेत सापडल्या. कांदळवनात अतिक्रमणाचे प्रकार सातत्याने समोर येत असतानाच करावे जेट्टी परिसरात वैद्यकीय कचरा सापडला आहे. यापूर्वीही कांदळवन परिसरातून शेकडो कचरा पर्यावरणप्रेमींनी साफ केला आहे. तरीदेखील परिस्थिती ‘जैसे थे’ आहे.
कचऱ्याबरोबरच अतक्रिमण आणि नुकसान भरपाई हा मुद्दा देखील तितकाच गंभीर होत आहे. याआधी मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या (एम.आर.व्ही.सी) बोरिवली – विरार स्थानकांदरम्यानच्या प्रकल्पासाठी १२.८ हेक्टर क्षेत्रावरील कांदळवनांचे स्थलांतर करण्यास केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाने मंजुरी दिली होती. त्याचवेळी होणाऱ्या नुकसानाची भरपाई म्हणून वनीकरण करण्याची अटही घालण्यात आली होती. त्याची नुकसान भरपाई म्हणून गडचिरोलीत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, कांदळवन आणि जमिनीवरील झाडे निसर्गात जैवविविधतेच्यादृष्टीने निरनिराळ्या भूमिका बजावतात. कांदळवनाच्या विनाशाचा परिणाम पर्यावरणावर आणि मच्छीमार समाजाच्या उपजीवीकेवर होतो.
दरम्यान, रविवारी राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत करावे जेट्टी परिसरातील कांदळवनात मोठ्या प्रमाणात वापरलेल्या सिरिंज, इंजेक्शन, ड्रिप बॉटल्स, पट्य्या आणि इतर जैववैद्यकीय वस्तू सापडल्या आहेत. कांदळवनात कचरा, अतक्रिमण वाढत असल्याकडे पर्यावरणप्रेमी सातत्याने लक्ष वेधत आहेत. कांदळवनांची साफसफाई करुनही पुढील काही दिवसांत तेथे कचऱ्याचा ढिग साचलेला दिसतो. त्यात प्लास्टिक पिशव्या, काचेच्या बाटल्या, प्लास्टिक बाटल्या यांचा समावेश असायचा. आता वैद्यकीय कचराही टाकला जात आहे ही आश्चार्याची बाब आहे, असे मत एन्व्हायन्मेंट लाईफ फाउंडेशनचे संस्थापक धर्मेश बराई यांनी व्यक्त केले. तसेच हे सुशिक्षितपणाचे लक्षण नसल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंट नियम, २०१६ नुसार असा कचरा उघड्यावर टाकणे बेकायदेशीर आहे. संबंधित संस्था किंवा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कांदळवने महत्त्वाची का
कांदळवनामध्ये झाडे, झुडपे, ताड जातीची झाडे, औषधी वनस्पती आणि जमिनीलगत वाढणाऱ्या प्रजातींचा समावेश असतो. त्यांच्या मुळांचा जमिनीवर असलेला भाग गुंतागुंतीसारखा वाटत असला तरी ही मुळे एकप्रकारे भरतीच्या पाण्याचा वेग रोखणाऱ्या बफरसारखे काम करतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कांदळवने ही हवामान बदलाचा सामना करण्यासाठीही मदत करतात. कांदळवनातले वृक्ष आणि दलदल हे कार्बन सिंक सारखे काम करतात, म्हणजे तो मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात. तसेच ते मासे, खेकडे यासारख्या जलचरांचे आश्रय स्थान आहे.
याचे धोके काय
– वैद्यकीय कचऱ्यात असलेल्या रसायनांमुळे माती आणि पाण्याचे प्रदूषण होऊ शकते, ज्याचा थेट परिणाम कांदळवना्च्या वाढीवर होतो.
– कांदळवनात राहणाऱ्या पक्षी, मासे, कीटकांना या कचऱ्यामुळे विषबाधा होऊ शकते. काही प्रजाती यामुळे नामशेष होण्याचा धोका असतो.
– पावसाळ्यात किंवा भरतीच्या वेळी हा कचरा समुद्रात वाहून जातो. यामुळे पाणीप्रदूषण होऊन जलचरांना जास्त धोका निर्माण होतो.